पार्थ आराध्ये
पंढरपूर- उजनी जलाशयावर आज सकाळपर्यंत 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणातून भीमा नदीच्य पात्रात 25 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. यामुळे व गेले दोन दिवस नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस पाहता नदीची पाणी पातळी वाढली असून पंढरपूरजवळ नदीचा विसर्ग 63 हजार 517 क्युसेक इतका होता.

उजनी प्रकल्पावर रात्रीत 75 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजवर या पावसाळा हंगामात भीमानगर एकूण 720 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान उजनी धरणाचे सोळा दरवाजे 0.44 मीटरने उघडून यातून 25 हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडले जात आहे.

दरम्यान भीमा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने ओढे नाले भरून नदीत मिसळत असल्याने भीमेची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. पंढरपूरला सकाळी नदी 63 हजार क्यसेकने वाहत होती. कासाळगंगा तसेच माण नद्या भरल्याने हे पाणी भीमा नदीत मिसळत आहे. याचा परिणाम पाणी पातळी वाढत चालली आहे.
दरम्यान भीमा खोऱ्यात अन्यत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. केवळ उजनीवर पावसाची नोंद आहे. दरम्यान दौंडची आवक 6351 क्युसेक इतकी आहे. उजनी धरण 109 टक्के भरलेले आहे.