बार्शी : बार्शी न्यायालयात सुरु असलेल्या दाव्यातील वकिलपत्र मागे घ्यावे म्हणून वैराग येथील वकिलास मारहाण करण्यात आल्याची घटना वैराग येथे घडली.
बार्शी न्यायालयात वकिली करणारे रोहित राजेंद्र घोडके (वय ३०) रा. भुसार गल्ली, वैराग हे दि. ११ एप्रिल २०२२२ रोजी सकाळी साडेदहाचे सुमारास उस्मानाबाद येथील कोर्ट कामासाठी मोटरसायकलवरुन जात होते. ते वैरागमधील गांधी चौकात आले असता वैरागमधील जंगले गल्लीत रहाणारे शंकर काशीनाथ चव्हाण व नागेश चव्हाण या दोघांनी त्यांची गाडी अडविली. आणि तू आमच्या विरोधात बार्शी कोर्टात चालवित असलेल्या दाव्यातील वकिलपत्र मागे घे म्हणत, शंकर काशीनाथ चव्हाण याने काठीने मारहाण करुन आणि नागेश चव्हाण याने हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मुक्कामार देवून जखमी केले.

सदर भांडण चालू असलेल्या ठिकाणी रोहित घोडके यांचा भाऊ अमोल राजेंद्र घोडके तसेच विक्रम खेंदाड, योगेश चिखले हे भांडण सोडविण्यासाठी तेथे आले असता, अमोल घोडके यांनाही त्या दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दोघा भावांना शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
अशी फिर्याद रोहित घोडके यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन शंकर काशीनाथ चव्हाण व नागेश चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.