बार्शी ते बॉलिवूड शाहरुखच्या सिनेमात बॉबीसोबत झळकला ‘बार्शीचा समीर’
मुंबई – बार्शी तिथं सरशी असं आपण नेहमीच म्हणतो. आता, याच बार्शीची बॉलिवूडपर्यंत सरशी झाली आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित्त आणि अतुल सबरवाल दिग्दर्शित ‘क्लास ऑफ 83’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. बादल, सोल्जर, बिच्छू यांसारख्या हीट चित्रपटानंतर गायब झालेला अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा मुंबई हेड कॉप्सच्या भूमिकेतून कमबॅक करतोय.

बॉबीसोबत या चित्रपटात बार्शीपुत्र अभिनेता समीर परांजपेनं बॉलिवूडमध्ये एंट्री केलीय. बार्शीसारख्या ग्रामीण भागातील मुलाचा बार्शी ते बॉलिवूड हा प्रवास तरुणाईसाठी आणि बार्शीकरांसाठी अभिमानास्पद आहे.
सैय्यद युनूस हुसैन जैदी यांच्या ‘क्लास ऑफ 83’ या कादंबरीतील सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट 21 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. डिजिटल इंडियात, वेबसिरीज अन् नेटफ्लिक्सचा जमाना सुरू झालाय.

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, युट्यूबच्या इंटरनेट युगात आता 70 मिमिचा सिनेमाही डिजिटल झाला आहे. याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिग्गज अभिनेत्यांची एंट्री होत आहे, काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा नवाब सैफ आणि नवाजुद्दीकीनच्या सेक्रेड गेम्सने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.

त्यानंतर, आता बॉबी देओलच्या ‘क्लास ऑफ 83’ चीही चांगलीच चर्चा रंगलीय. सध्या कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने नव्या चित्रपटांचं प्रदर्शन थांबलं असता, नेटफ्लिक्सवर 21ऑगस्टपासून रसिक प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.

‘क्लास ऑफ 83’ मध्ये #समीर एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकतोय. मुंबईतील 1983 च्या अंडरवर्ल्डची सत्यकथा या थ्रिलर चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. IPS विजय सिंह (बॉबी देओल) च्या स्पेशल फोर्समध्ये इन्स्पेक्टर अस्लम खानच्या भूमिकेत समीरनं जी-तोड मेहनत केल्याचं सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसतंय.
या भूमिकेसाठी 800 जणांमधून त्याची निवड झाली आहे. यापूर्वीही, मराठी मालिका #माझे_पती सौभाग्यवती आणि गोठमध्ये समीरने नायकाची भूमिका निभावली असून भातुकली या मराठी चित्रपटातही काम केलंय.

समीर बार्शीतील सुलाखे हायस्कुलचा विद्यार्थी असून कँसर हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी किशोर परांजपे यांचा मुलगा आहे. त्याने दहावीनंतर पुण्यातून इंजिनियरची पदवी घेतली, मात्र कला क्षेत्रातील आपली गोडी कायम जपली. त्यासाठी, आई माजी उपनगराध्यक्ष अरुणा परांजपे आणि वडिलांनीही त्याला सतत प्रोत्साहन दिलं.
त्यामुळेचं आज 4-5 वर्षाच्या संघर्षानंतर त्याच्या बार्शी ते ‘बॉलिवूड’ प्रवासाला सुरुवात झालीय. आपला हक्काचा माणूस आज स्वप्ननगरीत पोहचलाय. म्हणूनच, 21 ऑगस्ट रोजी बार्शीकरांनी हा सिनेमा पाहून समीरच्या कारकिर्दीला शुभेच्छा द्यायलाच हव्यात. त्याचं अभिनंदन करायलाच हवं.