बार्शी : श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था नवी दिल्ली यांच्या कडून प्लाझमा थेरेपीसाठी सोलापूर जिल्ह्यात प्रथमच मान्यता मिळाली आहे. जागतिक महामारी कोव्हीड 19 रूग्णांना उपचारासाठी उपयुक्त ठरत असलेली प्लाझमा थेरपीचा उपयोग कोव्हीड बाधित रूग्णावर यशस्वीरित्या केला जाऊ शकतो त्यामुळे कोव्हीड रूग्णाना नवजीवन मिळण्याची शक्यताही आहे.

मुंबई पुणे सारख्या महानगरात सध्या प्लाझमा दान करून कोव्हीड रूग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यात येत असतानाच बार्शी सारख्या निमशहरी भागातही इंडीयन रेडक्रॉस सोसायटी संचलीत श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला प्लाझमा थेरपीजची अधिकृत मान्यता मिळाली आहे ही बाब बार्शीकरांसाठी व जिल्ह्यातील कोव्हीड रूग्णांना मोठा दिलासा देणारी आहे.
सध्या शहर व सोलापूर जिल्ह्यात कोव्हीड 19 चे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोव्हीड 19 सारख्या असाध्य रोगावर अद्याप तरी प्रभावी लस किंवा औषध निघाले नाही. जगभर कोव्हीड 19 च्या लस व प्रभावी औषधासाठी संशोधन सुरू आहे. मात्र निश्चित असे प्रभावी व उपयुक्त ठरेल असे सद्यतरी कोणतेही औषध उपलब्ध नाही.

या पार्श्वभूमीवर कोव्हीड 19 चा पॉझिटीव्ह रूग्ण हॉस्पिटलमधून योग्य उपचार घेऊन पूर्णतः बरा झाल्यानंतर 28 दिवसानंतर त्याच्या अॅन्टी बॉडीजची (प्रतिकार शक्ती) चाचणी घेतली जाते त्यामध्ये जर कोव्हीड 19 च्या अॅन्टी बॉडीज (प्रतिकार शक्ती) आढळल्या नंतर त्याच्या इतर सर्व चाचण्या करून त्याचा प्लाझमा काढला जातो व जो कोव्हीड 19 पॉझिटीव्ह रूग्ण उपचार घेत आहे त्याला तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली तो प्लाझमा देण्यात येतो.

त्यामुळे कोव्हीड पॉझिटीव्ह रूग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढते तो लवकरत बरा होण्याची शक्यताही असते. सदरची सुविधा बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला मिळवून देण्यासाठी बार्शीचे सुपुत्र व राज्याचे अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त अरूण उन्हाळे (मुंबई), पुण्याचे सह आयुक्त एस.बी पाटील व सोलापूरचे सहाय्यक आयुक्त भालेराव यांनी सहकार्य केले.

सदरची सुविधा बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीत सुरू करण्यासाठी रक्तपेढेची चेअरमन डॉ.विक्रांत निमकर, रक्तपेढीचे प्रमुख डॉ. रामचंद्र जगताप, रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
चौकट ः आवाहन.. बार्शी शहर व तालुक्यातील कोव्हीड 19 या आजारातून उपचार घेऊन घरी परतलेल्या नागरीकांना आवाहन करण्यात येते की अशा नागरीकांनी स्वखुशीने प्लाझमा दान करण्यासाठी रक्तपेढीत यावे जेणे करून आपल्या प्लाझमा दानमुळे कोव्हीड बाधितांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होईल असे आवाहन श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी केले