बार्शी शेअर मार्केट घोटाळा: विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा सविस्तर काय घडले कोर्टात
बार्शी: बार्शी येथे शेअर मार्केट च्या नावाखाली ‘विशाल फटे यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीची चर्चा गेल्या आठ दिवसापासून राज्यात गाजत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला मुख्य आरोपी विशाल फटे हा काही दिवस फरार देखील होता. दरम्यान सोमवारी स्वत:हून सोलापूर पोलीस मुख्यालयात पोलिसांत हजर झाल्यानंतर फटे याला आज बार्शीतील जिल्हा न्यायालयात हजर केले होते.


याठिकाणी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर फटे याला अति जिल्हा सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आज दिवसभर फटे याला न्यायालयात हजर करणार अशी चर्चा असल्यामुळें दिवसभर मीडियासह सर्वसामान्य नागरिकांनी त्याला पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कोर्ट आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.
सोमवारी सकाळी आरोपी विशाल फटे याने स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली दिली आणि रात्री तो पोलिसांत हजर देखील झाला. ज्यानंतर आज (मंगळवारी) त्याला बार्शी न्यायालयात हजर केले गेले. यावेळी फटेच्या वकिलांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने कमी दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला. पण याला विरोध करत सरकरी वकिल प्रदीप बोचरे यांनी पोलिसांची बाजू मांडली. ज्यानंतर अखेर न्यायालयाने फटे याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
