बार्शी : एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या प्रदीर्घ संपानंतर आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महांडळाचे राज्य शासनात विलिनीकरण होणार नाही, हे शासनाने स्पष्ट केल्यानंतर, बार्शी आगारातील सध्याची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ‘बार्शी लाईव्ह’ ने बार्शी आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांच्याशी बातचीत केली.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आगार हे सर्वाधिक म्हणजे २०,००० किमी क्षमतेने सुरु आहे, आणि त्यात अजूनही वाढ होत आहे.
खाजगी वाहतूकदार प्रवाश्यांची लूट करत आहेत, त्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित, विश्वासार्ह अशा एसटी बसनेच प्रवास करावा. आणि न्यायालयाचा येईल तो निर्णय सर्वांनाच बंधनकारक असेल, पण त्याची वाट न बघता कर्मचाऱ्यांनी कामावर यावे असे आवाहन प्रवाश्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाकळे यांनी यावेळी बोलताना केले.
तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत बार्शी बसस्थानकाची निवड झालेली आहे. त्यामुळे २२ कोटी ८० लाख रुपये प्रकल्प मूल्य असलेले भव्य बसस्थानक, विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नातून लवकरच होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

- बार्शी आगारात एकूण ३८६ कर्मचारी आहेत
- त्यापैकी आत्तापर्यंत १९२ कामावर रुजू झाले आहेत.
- सध्या २० चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती केली आहे.
- बार्शी आगारात ९१ बस आहेत त्यापैकी ५५ धावत आहेत.
- संपाच्या आधी म्हणजे ६ नोव्हेंबर २०२१ पूर्वी बार्शी आगाराच्या नियमित २६६ फेऱ्या होत होत्या त्या सध्या १६० होत आहेत.
- पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, मोहोळ, अक्कलकोट, तुळजापूर या मार्गावर सध्या पूर्ण क्षमतेने बस धावत आहेत.
- तर बोरीवली २ पैकी १, औरंगाबाद २ पैकी १ याप्रमाणात फेऱ्या सुरु आहेत.
- संपपूर्व काळातील रोजचे सरासरी उत्पन्न १४ लाख रुपये होते, ते सध्या साडेसात लाख रुपये इतके झाले आहे
- महामंडळाला इंधन महाग मिळत असल्याने २७ मार्चपासून बसमध्ये कदम यांच्या खासगी पेट्रोल पंपावरुन डिझेल भरले जात आहे.
- कोरोना निर्बंध मुक्ती, जत्रा, उरुस, सुट्ट्या, लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत त्यासाठी उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळानुसार अधिकाधिक फेऱ्यांचे नियोजन केले जात आहे.
- बंद असलेले पंखे, ट्यूबलाईट सुरु केले आहेत, स्वच्छतेची कामे सुरु आहेत. पाण्यासाठी नळ आहेत. खाजगी पाणपोईसुध्दा लवकरच सुरु होईल. प्रवाश्यांना चांगल्या सुविधा देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे.