बार्शी सोलापूर रस्त्यावर चाकूच्या धाकाने दांपत्याला लुटले
बार्शी : बार्शीतून गांवाकडे परत जाणाऱ्या दांपत्याच्या मोटरसायकलला पाठीमागून धक्का देऊन खाली पाडून, त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ९० हजारांचा ऐवज लुटल्याची घटना बार्शी सोलापूर रस्त्यावर घडली.

कल्याण दत्तू जाधव, (वय ५७) रा. भांडगांव, ता. बार्शी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
दि. १६ ऑगस्ट रोजी बार्शीतील एका कार्यालयातील साखरपुड्याच्या कार्यक्रमांस पत्नीसह उपस्थित राहून, एमएच-१२-जेएल-५०१४ या क्रमांकाच्या मोटरसायकलवरुन ते दोघे गांवाकडे परत निघाले होते.

रात्री साडेनऊचे सुमारास सोलापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाच्या पुढे लक्ष्मी मंदिराजवळ ते दोघे आले असता, पाठीमागून दोन मोटरसायकलवरुन आलेल्या चार इसमांनी त्यांना पाठीमागून धक्का देऊन रस्त्यावर पाडले.
त्याचवेळी त्या चौघांपैकी एका इसमाने चाकू काढून जाधव यांच्या पोटाला लावला, आणि इतरांनी तुमच्याजवळ काय आहे ते काढून द्या म्हणत त्यांच्या विरोधाला न जुमानता जाधव यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे गंठण, सोन्याची फुले व झुबे, बोरमाळ तसेच त्या दोघांकडील रोख रक्कम रुपये तीन हजार असा एकूण नव्वद हजार पाचशे रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला आणि त्यांच्या मोटरसायकलची चावी घेऊन ते चौघे बार्शीच्या दिशेने पसार झाले.
कल्याण जाधव यांच्या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३४, ३९४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
साभार बार्शी विशेष