बार्शी : येडशी येथील रहिवासी मारोतराव देशमुख यांच्यावतीने जगदाळे मामा हॉस्पिटलला नविन ॲम्ब्युलन्स हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते आणि डॉ. रागिनी पारिख यांच्या उपस्थितीमध्ये दि. २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला.
मारोतराव देशमुख हे संस्थेचे माजी कर्मचारी असून, डॉ. जयंत देशमुख (भूलतज्ञ) व श्रीकांत देशमुख उपसंचालक, टाउन प्लॅनिंग, मुंबई यांचे पिताश्री आहेत.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव, सचिव पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, मेडिकल सुपरी.डॉ. आर. व्ही. जगताप, डॉ.जी. एम. पाटील, संस्थेचे ट्रस्टी आणि सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख परिवाराच्या दातृत्वाबद्दल डॉ. तात्याराव लहाने यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी जगदाळे मामा हॉस्पिटलच्या सेंट्रल आयसीयू व ट्रॉमा युनिटची त्यांनी पाहणी केली.

ग्रामीण भागातील रुग्णांकरीता स्वप्नवत वाटणारा हा प्रकल्प पूर्णत्वास आल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करुन, बार्शी आणि उस्मानाबाद परिसरांतील रुग्णांना या रुग्णसेवेचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होईल आणि निश्चितच कर्मवीर मामासाहेब यांचे ग्रामीण भागातील रुग्णसेवेचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हॉस्पिटलच्या सर्व विभागांची पाहणी केल्यानंतर, येथून पुढे हॉस्पिटलला आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन राहील असे डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ.रागिणी पारेख यांनी मान्य केले .
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष डॉ. बी .वाय. यादव यांनी ट्रॉमा युनिटचे काम सुरु असून, त्यातील कॅथलॅब तसेच इतर यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये उभारण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगतिले. संस्थेकडून लवकरच रुग्णांकरिता ट्रॉमा युनिट उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच देशमुख कुटुंबीयांचे आभार मानून, त्यांनी केलेल्या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमांस हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण गाढवे यांनी केले, तर जयकुमार (बापू )शितोळे यांनी सर्वांचे आभार मानले.