आर्यन शुगर्स ची थकीत एफआरपी ची रक्कम दिवाळी पूर्वी मिळणार-आमदार राजेंद्र राऊत
आर्यन शुगर या साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांची ( एफ.आर.पी. ) २१ कोटी रुपये रक्कम दिवाळी पूर्वी देण्याचे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आदेश दिले आहेत.

यापूर्वी ८ सप्टेंबर २०२२ रोजी, जिल्हाधिकारी यांनी आर्यन शुगर या साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या शेतकऱ्यांची एफ.आर.पी. रक्कम २१ कोटी वसुली बाबत बैठक आयेाजित केली हेाती. या बैठकीत पुढील १५ दिवसांत थकीत ऊस बिलाचा अंतिम निर्णय घेण्याचे ठरले होते.

यानुसार आज मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सुमारे एक तास बैठक चालली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल दिवाळी पूर्वी देण्याचे आदेश दिले आहेत. सदर बैठकीस आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, साखर संचालक, डिसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई ,सुनील शेरखाने उपस्थित होते.

सदरची रक्कम देणे करीता मा. तहसीलदार बार्शी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली असून, या समितीत साखर आयुक्तांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे प्रतिनिधी, आर्यन शुगरचे सभासद शेतकरी प्रतिनिधी व आर्यन शुगरचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
या आदेशानुसार आर्यन शुगर(येडेश्वरी शुगर) कारखान्याचे बजरंगबप्पा सोनवणे यांनी थकीत ऊस बिलाची रक्कम दिवाळी पूर्वी देण्याचे जाहीर केले आहे.