सोलापूर : तीन ते चार वर्षांनंतर सोलापूर जिल्ह्यात यंदा जून-जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

तसेच सोलापूर जिल्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरण क्षेत्रात ही दमदार पाऊस पडत असल्याने यंदा जुलै महिन्यातच धरणात जवळपास साडेतीन टीएमसी पाणी वाढले आहे.
त्यामुळे मायनस 10 टक्के असलेले धरणातील पाणी बुधवारी सायंकाळी-1.62 टक्केवर आले आहे. दौंड येथून विसर्ग सुरू असल्याने व पुणे जिल्ह्यातपाऊस सुरू असल्याने आज धरण प्लस मध्ये येईल असे दिसत आहे.


यावर्षी एक जूनला पावसाला सुरुवात झाली. एक जूनपासून सातत्याने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. जून तसेच जुलै महिन्यात रविवारपर्यंत १४४ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक २२९.७ मि.मी. म्हणजे १९२ टक्के पाऊस पडला आहे.
माढा तालुक्यात २४७ मि. मी.(१८२ टक्के), मोहोळ तालुक्यात २१५ मि.मी (१७०.६ टक्के), माळशिरस तालुक्यात २४० मि.मी. (१६४ टक्के), करमाळा तालुक्यात २०४ मि. मी. (१५१ टक्के), सांगोला तालुक्यात १९८ (१४९ टक्के),

बार्शी तालुक्यात २३४ मि.मी. (१४७ टक्के), पंढरपूर तालुक्यात १९४ मि.मी.(१३८ टक्के) तर दक्षिण सोलापूर तालुक्यात १४५ मि.मी. (१०४ टक्के) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात १५५ मि.मी. (९९ टक्के) तर उत्तर सोलापूर तालुक्यात १५४ मि.मी. (९२ टक्के) पाऊस पडला आहे.
