औरंगाबाद | कोरोना काळात अनेक मीडिया हाऊस आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहेत, तर कुणी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी करत आहे. मात्र अशा काळात मराठवाड्यासारख्या अतिशय ग्रामीण भागातून आलेल्या तरुणानं सुरु केलेल्या एका वेब पोर्टलला थेट गुगलनं आर्थिक मदत केली आहे.

मनोज जाधव असं या तरुणाचं नाव आहे. मनोज मूळचा पैठण तालुक्यातील मुलानी वाडगावचा रहिवासी आहे. त्याने पुण्यात एनरिच मीडिया प्रा. लि. या कंपनीची स्थापना करुन तिच्या अंतर्गत कृषिनामा हे कृषिविषयक माहिती आणि बातम्या देणारं पोर्टल सुरु केलं आहे. हे पोर्टल अल्पावधितच लोकांच्या पसंतीस उतरलं आहे.

कोरोना काळात इतर क्षेत्रांवर जसा परिणाम झाला तसाच तो पत्रकारिता क्षेत्रावरही झाला. पत्रकारांना तसेच माध्यम संस्थांना याची झळ पोहोचू नये म्हणून गुगलने अशा संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत मनोजच्या कृषिनामा पोर्टलची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.

आम्ही नेहमी दर्जेदार मजकूर देण्याचा आणि त्यामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अशात गुगल आपली निवड करेन असा विचारही मी कधी केला नव्हता, परंतु शेवटी चांगल्या कामाचं फळ मिळालं, असंच म्हणावं लागेल. आता उत्साह जसा वाढला आहे, तशीच जबाबदारी देखील वाढली आहे. पुढील काळात कृषिनामावर अधिक दर्जेदार माहिती तयार करु, असं एनरिच मीडियाचे संचालक मनोज जाधव यांनी म्हटलं आहे.