लग्न आणि मुला-मुलींचे वय, समज-गैरसमज ; वाचा सविस्तर

0
966

असाच एक प्रश्न आला की, लग्न करताना वयात किती अंतर असावं, किंवा अंतर जास्त असेल तर काही समस्या येतात का?

खरं तर, लग्न करताना पूर्वी वयाचा विचार केला जात नसे.ही एक पुरुष प्रधान संस्कृती मधील विचार पूर्वक आखलेली आणि महिलांना कोंडीत कोंडणारी यंत्रणा होती.अस माझं प्रांजळ मत.आणि हे मत सामाजिक निरिक्षणातून तयार झालेलं आहे.कदाचित याबद्दल अनेकांची अनेक मते असू शकतात.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पूर्वी अनेक मूलं जन्माला घातली जायची.शेतीकामासाठी जास्त मनुष्य बळ लागे, किंवा मूलं म्हणजे देवाची देणगी असा लोकांचा समज होता, किंवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया त्याकाळी नव्हती.दुसरी गोष्ट अशी की,मुलगी वयात आली म्हणजे ती मुलं जन्माला घालू शकते एवढीच अपुरी माहिती होती.

वयात जरी आली तरी तीचं गर्भाशय अठरा वर्षांनंतर बाळ जन्माला घालण्यासाठी पक्व होते याचं ज्ञानच लोकांना नव्हतं.अजून एक गोष्ट अशी की, पूर्वी डझनभर मुलं जन्माला आली तरी त्यातील निम्मी देवाघरी जायची.कारण वैद्यकीय सेवा अगदीच कमी होत्या.मग काय पुरुष कितीही वयाचा झाला तरी तो मूल देऊ शकतो.

पण बाईची पाळी पंचेचाळीस ते पन्नास या वयापर्यंत असते.एकदा पाळी गेली कि,तीला मूल होतं नाही.त्यामुळेच की काय पूर्वी खूप मुलांसाठी मुलगी वयात आली की तिचं लग्न करत असावेत.तिथूनच एका बाईची पायमल्ली सुरू झाली असावी.

पण लग्न फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी नसतं.लग्नाचा उद्देश प्रजोत्पादन हा नक्कीच आहे.पण जीवन जगताना सहजीवन खूप महत्त्वाचे असते.मुलं नाही झाली तरी सहजीवन जगता येत नाही असं नाही.सहजीवनासाठी वय ही गोष्ट तशी फार महत्त्वाची नाही.परंतू लग्न करताना दोघांच्या वयात अंतर असावचं असं काही नाही.वय समान असेल तर वैचारिक अंतर कमी राहू शकतं.

आणखी एक जाणवलेली गोष्ट मुलगी मुलांपेक्षा मोठी नसावी असा गैरसमज आहे.पण तसं काही नसतं.आणि नसावं.या गोष्टी ठरवून लग्न करताना विचारात घेतल्या जातात.पण कधी कधी प्रेमात पडताना वयाचा विचार नसतोच.

समजा नवरा आणि बायको यांच्या वयात खूपच अंतर असेल तर काळातील फरकामुळे विचारात फरक असू शकतो.दुसरी गोष्ट म्हातारपणी बायको तरुण दिसते आणि नवरा म्हातारा.ही गोष्ट देखील मानसिक तणाव निर्माण करते.

खूप घटना अशा पाहिल्या आहेत कि, लहान मुलीचं लग्न वयात खूप अंतर असणाऱ्या माणसाशी झाले तर म्हातारपणी त्यांच्यात ताणतणाव निर्माण होऊ शकतो.

पण काळ बदलला तशी माणसांची विचारसरणी बदलली आहे.मुलगा आणि मुलगी यांची शारिरीक वाढ लक्षात घेऊन मुलीच वय अठरा आणि मुलाच वय एकवीस असावं असं विज्ञान सांगतं.पण आर्थिक स्थिरत्व येऊन लग्न व्हायला हा ठरविलेला टप्पा खूपच वाढत जातो.

पण त्यामुळेही अनेक समस्या उद्भ़वतात.पण लग्न होताना वयात अंतर असलंच पाहिजे असं काही नाही.आणि मुलगी मुलापेक्षा मोठी असली म्हणून काहीच बिघडत नाही.

पूर्वीच्या काळी मुलं जास्त जन्माला घालण्यासाठी असलेली ही अज्ञानातील विचारसरणी!पण ती कितपत योग्य याचा विचार ज्याचा त्यांनेच करावा.थोर मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांचं लग्न पंचवीस वर्षांच्या मुलीशी झालं.पण त्यांच मनाचं बॉंडींग खूप सखोल होतं.सचीन तेंडूलकर यांची बायको त्यांच्या पेक्षा मोठी आहे.

सांगण्याचा उद्देश हाच की, लग्न करताना वयापेक्षा मनं महत्वाची असतात.ज्याचा विचार आपल्या भारतीय लग्न व्यवस्थेत केला जात नाही.व.पु.काळे म्हणतात की, लग्नासाठी अक्षता लागत नाहीत तर दोन समजूतदार मनं लागतात.

आणि जेव्हा दोन मनांच लग्न होत असतं तेव्हा वय किंवा इतर गोष्टी अडचण ठरत नाहीत.पण पाश्चिमात्य संस्कृतीत दोघांना मुक्त स्वातंत्र्य असतं.पण भारतीय संस्कृतीचा विचार करता लग्न या बंधनास इथे खूप महत्त्व आहे.इथे लग्न करताना दोघांच्या वयात समान अंतर किंवा अंतरातील फरक कमी असेल तर एकमेकांना समजून घेणं सोपं जातं.

खरं तर ज्यांची वैचारिक पातळी प्रगल्भ असते,ज्यांच्याजवळ समजून घेण्याची कुवत असते,ज्यांना प्रेम कळतं आणि जे ते कृतीतून दाखवून देतात त्यांच्या सहजीवनात इतर गोष्टी गोण असतात.पण जे इतरांच्या नजरेतून आपलं आयुष्य जगतात त्यांना मात्र लग्न करताना दोघांच्या मनापेक्षा इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात.खूपदा असं दिसून येतं कि, अगदी एकाच वयाचे दोघेही असूनही दोघांच्या विचारात जमीन आस्मानाचा फरक असतो.

शेवटी कोणावर कोणत्या विचारांचा प्रभाव आहे किंवा कोण कोणत्या वातावरणात वाढला हेही महत्त्वाचे असते.आजही ग्रामीण भागातील माणसं खूप शिकली तरीही त्यांच्यावर त्याच जुन्या विचारांचा पगडा दिसतो.

काळाबरोबर बदलणं ज्याला जमतं नाही तो सतत संघर्षातचं आयुष्य संपवतो.पण ज्यांना सामान्य आयुष्य जगायचं असतं त्यांनी अवश्य वयाचा विचार करावा.पण हे असामान्य पातळीवर विचारपूर्वक जगतात ते स्वत:चं अडचणींवर मार्ग काढतात.

शेवटी काय,तुमची नजर जशी तसंच आयुष्य आकार घेत जातं.पण सुखमय सहजीवनासाठी प्रेम,आदर,व्यक्ती स्वातंत्र्य, एकमेकांना जपणं, समजून घेणं याच गोष्टी महत्त्वाच्या असतात.

लेखिका सौ सुधा पाटील

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here