बार्शी : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात विविध खात्यांतर्गत सुरु असलेल्या अनेक विकास कामांचा सद्यःस्थितीबाबतचा आढावा पंचायत समिती बार्शी येथील बैठकीत आ. राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या बैठकीत रोजगार हमी योजना विभाग, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, घरकुल विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, स्वच्छ भारत मिशन विभाग इत्यादी खाते प्रमुखांसोबत त्यांच्या खाते अंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या विविध कामांसंदर्भात माहिती घेऊन चर्चा करण्यात आली.


यावेळी आ. राजेंद्र राऊत यांनी तालुक्यात नव्याने करण्यात येणाऱ्या विकास कामांची तयारी, कार्यालयीन कामकाज करताना वरीष्ठ स्तरावर व शासन स्तरावर येणाऱ्या अडी-अडचणी, समस्या जाणून घेतल्या व त्यांचा पाठपुरावा करून ते काम मार्गी लावले जाणार असल्याची ग्वाही या बैठकीत संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीस पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य व संबंधित खातेप्रमुख उपस्थित होते.