बार्शी-कुर्डुवाडी रोडवर खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 2 ठार 12 जखमी
बार्शी : शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर बार्शी-कुर्डुवाडी बायपास नजीक खासगी बस व ऊस ट्रॉली घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार, तर १२ जण जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थ अनिल शिंदे (ट्रॅव्हल चालक वय 27 रा. वसवडी जि.लातूर), मनोज शिवाजी विद्याधर (रा.बोधनगर लातूर) अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. पुणे येथून लातूरला जाण्यासाठी खासगी बस प्रवासी घेऊन निघाली होती. यावेळी ट्रॅक्टर ऊसाच्या दोन ट्रॉली घेऊन नांदणी या गावाकडून विठ्ठल शुगर कार्पोरेशन या साखर कारखान्याकडे जात होता. दरम्यान दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

यामध्ये खासगी बसचा चालक सिद्धार्थ शिंदे व त्याचे शेजारी बसलेले मनोज विद्याधर यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टर चालक औदुंबर कोंढारे याच्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

अपघातामध्ये ट्रॅक्टरचे अक्षरशः तुकडे-तुकडे होऊन रस्त्याच्या कडेला पडले आहे. ऊस संपूर्ण रस्त्यावर विखूरला होता. खासगी बसचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण जाधव करीत आहेत.
रहमतअलि सादिकअलि सय्यद (वय 29), वसंत तुकाराम पाडोळे (वय 65), विठ्ठल नामदेव पांचाळ (वय 91), नेहा विजय सावळे(वय 52), पार्वती बाबूराव बचुटे(वय 49), अश्विनी राहूल कदम(वय 26), मनिषा बाळासाहेब नलावडे(वय 27), पुजा ज्ञानेश्वर बारोले(वय 38), कालिदास निरु चव्हाण(वय 26 सर्व रा.लातूर) विजया किसन पांचाळ (वय 47 रा.पुणे), हेमचंद्र दौलत मोरे(वय 40 रा.बारामती), दत्ता रवन कांबळे(वय 28 रा.बाभळगांव ता.कळंब)अशी जखमींची नावे आहेत.