बार्शी : मराठी नववर्षाच्या दिनी म्हणजे दि. २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडव्यादिवशीच, सुमारे आठ वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सासरच्या मंडळींनी तिचा सतत जाच करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
या घटनेची माहिती अशी की, पानगांव ता. बार्शी येथील जोतिराम गंगाराम येवले यांनी त्यांची लहान मुलगी संगीता (वय २६) हिचा विवाह २०१४ साली बाबासाहेब बळीराम मोरे, रा.साकत, ता.बार्शी यांच्याशी करुन दिला.
लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी मानपान, सोने, रक्कम यावरुन तिचा छळ सुरु केला. बाळंतपणाला जायचे तर दीड तोळे सोने आणि पन्नास हजार रुपये आणून दे. शेती खरेदी करायला अजून दोन लाख रुपये आण नाहीतर सोडचिठ्ठी दे. तसेच तू माहेरी जायचे नाही, त्यांना बोलायचे नाही, तू नीट काम करत नाही म्हणून शिवीगाळ, मारहाण करुन उपाशी ठेवून तिला सतत मानसिक त्रास देऊन तिचा छळ केला.
दि. २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडव्यादिवशीच संगीताने विषारी औषध प्राशन केले. बेशुध्द अवस्थेतच तिला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु रात्री उशीरा डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले.
त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्युला तिच्या सासरची मंडळीच कारणीभूत असून, त्यांनीच तिला विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
जोतिराम येवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाबासाहेब मोरे (पती), बळीराम मोरे (सासरा), सरस्वती मोरे (सासू), शशीकांत मोरे (दीर) सर्व रा.साकत, (हल्ली सर्व रा.शेती गट नं. ६५० मौजे पानगाव, ता. बार्शी) यांच्याविरुध्द बार्शी तालुका पोलिस ठाण्यात भा.दं.वि.सं. १८६० कलम ३०६,३२३,३४,४९८(अ),५०४,५०६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
