दिलेला शब्द पाळणारा नेता; अजितदादा ,जाणून घ्या त्यांचा ठळक राजकीय प्रवास

0
393

दिलेला शब्द पाळणारा नेता; अजितदादा

कोरोनामुळे सध्या माझ्यासह मंत्रिमंडळातले अनेक सहकारी मंत्री आपापल्या जिल्ह्यातून आपले कामकाज चालवत असतात, मंत्रालयात अगदी ५ ते १०% लोकांच्या उपस्थितीत कामकाज सुरू असले तरी महाराष्ट्राचे अर्थचक्र चालावे म्हणून एक मंत्री मात्र सकाळच्या सात पासून मध्यरात्रीपर्यंत मंत्रालयात दिसतात, कोणी असो नसो, त्यांचे कार्य मात्र अविरत सुरू असते; ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा!

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दादांची केबिन सकाळपासून अगदी मध्यरात्री पर्यंत सुरू असते, दादांच्या अविरत कार्यशैलीची हीच ती प्रेरणा आहे जी माझ्यासारखे असंख्य तरुण राजकारणात नव्याने काम सुरू करताना शिकायचा प्रयत्न करतात!

मी भारतीय जनता पक्षात असताना विविध कामानिमित्त नेहमी मंत्रालयात जायचो, त्याकाळी असलेल्या आघाडी सरकार मध्ये दादा उपमुख्यमंत्री होते. परळीसह बीड जिल्ह्यातील विविध कामानिमित्त नेहमी आमची भेट व्हायची. माध्यमांमध्ये चर्चिले जाणारे आम्ही दोन ‘पुतणे’ मित्र असे त्याकाळी म्हटले गेले आणि मी ते जाहीरपणे कबुलही केले. एक दोन भेटींमध्येच मी दादांचा फॅन झालो.

आम्ही मुंडे कोणत्याही कार्यक्रमाला कधी वेळेवर जात नाहीत अशी चर्चा असते, दादांच्या बाबतीत हे उलट आहे, कोणी नाही आलं तरी चालेल पण दादा कार्यक्रम, बैठक किंवा अगदी प्रचारसभा का असेना दिलेल्या वेळीच हजर होणार! बऱ्याचदा दादा लवकर आल्याने आमची तारांबळ सुद्धा होते!

तर त्या जुन्या दिवसांमध्ये माझी दादांची ओळख झाली, स्नेह वाढला… तसे दादा मला वयाने वडील आहेत, ते मला त्यांचा मित्र समजतात हे त्यांच्या मनाचं मोठेपण. मी आमच्या नेमक्याच मोठ्या संघर्षाने ताबा मिळवलेल्या परळी नगर परिषदेच्या विकासकामांबाबत चिंतीत होतो, दादा पहिल्यांदा आमच्या परळीला आले तेव्हा दिलेला शब्द त्यांनी एक क्षणात पूर्ण केला आणि कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी त्यांनी परळी शहराला दिला. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. परळीला पाणी देणारे ते भगीरथ ठरले. दादा दिलेल्या शब्दावर किती ठाम असतात याची प्रचिती त्या दिवशी मला आली.

दादांच्या अंगी असलेल्या स्पष्ट व सडेतोड वाणीमुळे आणि आजकाल सोशल मीडियाच्या वाढलेल्या अति वापरामुळे दादांच्या अंगी असलेल्या सकारात्मक सद्गुणांना बाजूला ठेऊन त्यांच्यावरील क्रीटीसीजमचा अधिक उदो उदो केला जातो, याचे वाईट वाटते.

माझ्यासारख्या राजकारणात व समाजकारणात काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याला अजित दादांसारख्या माणसाची पाठराखण मिळणे ही त्यातल्या त्यात एक मोठी गोष्ट आहे. कारण ‘अनंत टीकेचे धनी’ अशीच आमच्या दोघांची ओळख अनेकवेळा माध्यमांसमोर मांडली जाते.

दादांच्या अंगी असलेली दूरदृष्टी आणि त्यांचे विकासाचे समजून घ्यायचे असेल तर बारामतीला किंवा त्यांनी उभा केलेल्या पिंप्री चिंचवड ला एकदा भेट देऊन तिथे पाहिले पाहिजे.

दादांचा कामे करण्याचा धडाका, लोकांशी जनसंपर्क, प्रशासनावरील मजबूत पकड, त्यांच्यातील धैर्य आणि संयम या अशा एक ना अनेक गोष्टी सांगता येतील, ज्या मी त्यांच्याकडे बघून शिकायचा प्रयत्न करतो आहे.

दादांच्या एकसष्ठीच्या निमित्ताने एक किस्सा आवर्जून सांगावा वाटतो. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान शी संबंधित एका महाविद्यालयाच्या ऍडमिशन प्रक्रियेत दादा प्रमुख होते. चार – दोन मार्कवरून ऍडमिशन न मिळू शकलेली एक विद्यार्थिनी माझ्यासारख्या एका राजकीय कार्यकर्त्यांची शिफारस घेऊन दादांकडे ऍडमिशन मिळावे यासाठी विनंती करायला गेले. त्यांना बसवून दादांनी विचारलं, ‘मार्क कमी आहेत तुझे बाळा, आता मला अमुक व्यक्तीने सांगितले हिला ऍडमिशन द्या, म्हणून मी एकवेळ ऍडमिशन करून घ्यायला सांगतो तुझं, परंतु आपल्याला कमी मार्क असताना, या सीटच्या साठी असलेला योग्य उमेदवार सोडून तुला ऍडमिशन द्यायचं म्हणजे त्या योग्य उमेदवारावर अन्याय नाही का होणार? तुम्ही पुढील शिक्षण घेऊन जेव्हा समाजाला त्याचा फायदा मिळवून द्याल, त्यावेळी समाज जास्त योग्यतेचा उमेदवार असायला हवा होता असं नक्कीच म्हणेल!’ दादांच्या स्वभावातील हे आशय कधी समाजासमोर आले नाही.

सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी आणि दादांनी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पात दादांनी सामाजिक न्याय खात्याला भरभरून निधीची तरतूद केली. करोनाच्या काळात राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती चा विषय मी त्यांच्याकडे घेऊन गेलो तेव्हा एका तासात सोडून तातडीने निधी उपलब्ध करून दिला.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णयही दादांनीच घेतला, इतकेच नव्हे तर या स्मारकाच्या सनियंत्रण आणि देखरेखीची जबाबदारी ही माझ्याकडे असलेल्या खात्याकडे सोपवली. ऊसतोड कामगारांसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊस तोड कामगार महामंडळाची घोषणा त्यांनी अर्थसंकल्पात केली.

विरोधी पक्षनेता म्हणून विधान परिषदेत काम करत असताना धनंजय सत्ताधारी पक्षावर आरोप नक्की कर, मात्र ते त्यांनी आपल्या वर केले त्याप्रमाणे व्यक्तिगत असू नयेत तर ते पुराव्यांसह असले पाहिजेत असा त्यांचा नेहमीच आग्रह होता. या शिकवणीतून मी महाराष्ट्रातील सोळा मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण पुराव्यासह सभागृहात मांडू शकलो याचे श्रेयही अजितदादा यांनाच आहे.

दादा म्हटलं की आठवतात गेल्या दहा वर्षातल्या अनेक आठवणी, दादांनी किती संघर्ष केला, दादांनी व्यक्तिमत्वावर लावण्यात आलेले डाग धुवून काढण्यासाठी काय काय केलं, आपल्या नावाने गाडीभर पुरावे घेऊन आरोप करणाऱ्यांना ते आरोप कसे खोटे होते हे सिद्ध करून दाखवले हे सबंध महाराष्ट्राने पाहिलं.

‘अजित योद्धा’ असलेल्या ‘माणूस जिवाभावाचा’ म्हणवणाऱ्या दादांना एकटे पाडून ईडी – बिडी मध्ये अडकवण्याचे अनेक प्रयत्न झाले, त्यादिवशी मी दादांच्या सोबत होतो. राजकीय आयुष्यात अनेक आरोप सहन करून लोकांसाठी काम करायचा प्रयत्न करत असताना द्वेष आणि तिरस्काराने कोणी आपल्याला नाहक खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करत असेल तर काय वेदना होतात, त्या मीही अनुभवलेल्या आहेत!

पण त्यादिवशी दादांना भावनिक झालेलं मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं! अर्थात षडयंत्राचा शेवट निर्मोही माणसांना कसा करायचा असतो ते सांगायची गरज नाही.

दादा आणि मी या नात्यामध्ये एक मजबूत धागा आहे त्या धाग्याचं नाव आदरणीय पवार साहेब! जोपर्यंत ते आमच्या पाठीशी आहेत, असे कोणतेही षडयंत्र हाणून पाडायची ताकत दादांमध्ये आहे.

दादा आता आपले एकसष्ठी मध्ये पदार्पण झालंय, आपण माझ्यासारख्या अनेकांचे प्रेरणास्थान आहात, आपण करत असलेलं काम, कोरोना सारख्या महामारी मध्ये आपण राज्यातील जनतेला दिलेला आधार आम्ही कधीही विसरणार नाही, तुम्ही मंत्रालयात बसून रोज सकाळच्या सात वाहल्यापासून मध्यरात्री पर्यंत लोकांसाठी केलेलं काम आम्ही कधीच विसरणार नाही; बस तुम्ही स्वतःची काळजी घ्या… आपल्या हातून कायम सत्कार्य घडो…. हा संदेश आदरणीय दादांना या माध्यमातून देतो.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, दिलेला शब्द पाळणारच याप्रमाणे आम्हा कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या आदरणीय दादा यांना एकसष्ठीच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रभू वैद्यनाथकडे आपल्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.

  • Dhanajay Munde

दादा म्हणून अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असणारं हे व्यक्तिमत्व किती परखड आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अजितदादांची राजकीय कारकीर्द जबरदस्त आणि गडद आहे. गडद यासाठी की अजित दादांनी आपल्या राजकीय कार्यकाळात धडाकेबाज कामाने आणि स्पष्ट वाणीने महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवला आहे. आज आपण काही ठळक मुद्द्यांमध्ये अजित दादांचा राजकीय प्रवास पाहूया.

१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.

अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४, २०१९ असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.

महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

२००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी कॉंग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.

त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित दादा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत.

आजवर अजितदादांनी भूषविलेलली पदे :-

  1. विश्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती
  2. संचालक: छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे
  3. संचालक : श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा, पुणे
  4. संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
  5. संचालक : सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
  6. संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
  7. संचालक : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पुणे
  8. संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी.दूध उत्पादक संघ, पुणे
  9. संचालक : रयत शिक्षण संस्था, सातारा
  10. माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक, मुंबई
  11. माजी संचालक : महानंद
  12. माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
  13. अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक – मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८
  1. अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक – डिसेंबर, इ.स. १९९८ ते ऑक्टोबर, इ.स. १९९९
  2. अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर इ.स. २००५ ते मार्च २०१३
  3. अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – ऑगस्ट , इ.स. २००६पासून
  4. अध्यक्ष : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च २०१३ पासून
  5. अध्यक्ष : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – सप्टेंबर इ.स. २००६पासून
  6. लोकसभा सदस्य : जून, इ.स. १९९१ ते सप्टेंबर, इ.स. १९९१.
  1. विधानसभा सदस्य : इ.स. १९९१ ते इ.स. १९९५, इ.स. १९९५ ते इ.स. १९९९, इ.स. १९९९ ते इ.स. २००४, इ.स. २००४ ते इ.स. २००९, इ.स. २००९ ते सप्टेंबर २०१४, ऑक्टोबर २०१४ मध्ये फेरनिवड. २०१९ साली राजीनामा.
  2. राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा – इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.
  3. राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.
  4. मंत्री – पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – ऑक्टोबर इ.स. १९९९ ते जुलै इ.स.२००४.
  5. मंत्री – ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – इ.स. जुलैै २००४ ते नोव्हेंबर २००४.
  6. मंत्री – जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – नोव्हेंबर, इ.स. २००४ ते नोव्हेंबर, इ.स. २००९.
  7. मंत्री – जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – नोव्हेंबर, इ.स. २००९ ते नोव्हेंबर, इ.स. २०१०.
  8. उप मुख्यमंत्री,(वित्त व नियोजन, ऊर्जा) – नोव्हेंबर, इ.स. २०१० ते सप्टेंबर इ.स.२०१२.
  9. उप मुख्यमंत्री(वित्त व नियोजन, ऊर्जा) – डिसेंबर इ.स. २०१२ ते इ.स. सप्टेंबर २०१४.
  10. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here