
सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त खवा बनविण्याऱ्या आस्थापनेची गोपनीय माहितीच्या आधारे मु. पो. कंदलगांव, ता. दक्षिण सोलापूर येथील हकमाराम चौधरी यांच्या मालकिच्या चौधरी दुध डेअरी या आस्थापनेवर सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी यशस्वीरित्या धाड टाकली.

सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या मदनराम पटेल यांच्याकडून कृत्रिमरित्या खवा बनविण्याचे काम सुरु होते. त्यांनतर सदर ठिकाणावरुन श्रीमती अस्मिता टोणपे यांनी खया व इतर भेसळकारी अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन खवा- १५० किलो, किंमत रुपये – २७०००८, रिफा. पामोलिन तेल (अपमिश्रक)- १०५ किलो, किंमत रुपये १८९१४, हिमालया कंपनीचे स्किम्ड मिल्क पावडर (अपमिश्रक) १६० किलो, किंमत रुपये- ५७६००, महादेव कंपनीचे स्प्रे ड्राईड स्किम्ड मिल्क पावडर (अपमिश्रक)- ८० किलो, किंमत रुपये- २८८००, साखर (अपमिश्रक)- ३०० किलो, किंमत रुपये – १०५०० व वनस्पती (अपमिश्रक)- १९५ किलो, किंमत रुपये- २६००० असे एकूण एकत्रित किंमत रुपये १६८८१४ चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
त्यांनतर सदर पेढीस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे नोटीस देण्यात आलेली आहे. उपरोक्त नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार पुढील योग्य ती कायदेशिर कारवाई घेण्यात येईल तसेच सर्व मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी अशा कृत्रिम खव्यापासुन मिठाई बनवु नये, तसे आढळून आल्यास त्यांचेवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कडक कारवाई घेण्यात येईल असे अवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांनी केले आहे.