लोकांच्या सूख दुःखांशी घट्ट नाते हाच माझ्या जीवनाचा मूलमंत्र; सांगत स्वतः राजन पाटील
जनसेवेतूनच यशस्वी राजकीय प्रवास….!!
ग्लोबल न्यूज: आज सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजन पाटील यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांनी स्वतः च्या वाटचालीचा आढावा घेत सोशल मीडियावर एक लेख प्रसिद्ध केला आहे.

वाचा त्यांच्याच शब्दात
माझे वडील स्व.बाबुरावअण्णा पाटील हे आमदार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे घरी राजकीय वारसा होताच. समाजकार्य आणि राजकारणातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात हास्य फुलवण्याचे कार्य आनंदाने केले पाहिजे, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पावलोपावली तत्पर राहीले पाहिजे, विविध क्षेत्रात आज कार्यरत असताना लोकांच्या चेहर्यावरील आनंद पाहून समाधान वाटते. १९८४ साली माझा विवाह झाला, त्यामुळे १९८४ हे सालच माझ्या आयुष्यात पहिला “सुखद धक्का,, देणारे ठरले.
कारण त्याच वर्षी मोहोळ तालुक्यातील अनगर या गावचा मी वयाच्या २४ व्या वर्षीच सरपंच झालो. आणि तेथूनच पुढे राजकीय कमान कायम चढतच राहीली आहे.१९८५ साली आ.बाबुरावअण्णा पाटील यांनी मोहोळ तालुक्यासाठी मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली होती.त्याच वर्षी माझ्यावर या पतसंस्थेच्या चेअरमनपदाची धुरा सोपवली गेली. त्यापाठोपाठ १९८६ साली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाली.


जिल्हा बँकेत सर्वात कमी वयाचा संचालक होण्याचा मान त्यावेळी मिळाला होता. शेतकऱ्याप्रती माझी असणारी तळमळ लक्षात घेऊन जिल्ह्यातील जेष्ठ मंडळींनी ७ जानेवारी १९८८ साली जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाची माळ माझ्या गळ्यात घातली.त्यानंतर पुढे १९९२ पर्यंत सलग चार वर्षे शेतकरी व सर्वसामांन्य माणूस केंद्रस्थानी ठेवूनच काम केले.
प्रामाणिक व पारदर्शकपणाने केलेल्या कामाची पोचपावती पुढेही मोहोळ तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने मिळत गेली. सोलापूर जिल्हा बँकेत अत्यंत कठोर पारदर्शकपणा आणि शिस्तबद्ध कार्य चालायचे त्यावेळच्या जिल्ह्यातील जेष्ठ नेतेमंडळी मुळेच आपणाला समाजकार्य व राजकारणाचे बाळकडू मिळाले १९९२ साली सोलापूर जिल्हा परिषदेत अनगर गटातून बिनविरोध निवडणूक जिंकली आणि पुढे लगेचच १९९४ साली पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाची माळ माझ्या गळ्यात पडली.
तत्पुर्वी जिल्हा बँकेत विश्वासाने केलेल्या कार्याची ही पोचपावती होती. विश्र्वास, शिस्त आणि पारदर्शिपणाने केलेल्या कार्याचे फळ १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत मिळाले आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. राष्ट्रवादी मधून १९९९सालची विधानसभा लढवली आणि त्या निवडणुकीत १८ हजारांच्या मताधिक्याने पुन्हा दुसऱ्यांदा आमदार झालो.
पुढे २००४ च्या निवडणूकीत ३२ हजारांच्या मताधिक्याने पुन्हा तिसऱ्यांदा आमदार झालो. २००९ साली मोहोळ मतदारसंघ राखीव झाला. पण आजवर या मोहोळ तालुक्यावर राष्ट्रवादीची सत्ता राखण्यात यशस्वी ठरलो आहे.गेल्या तीस वर्षांपासून जिल्हा बँकेत अविरतपणे कार्यरत आहे. त्यामुळे २९ डिसेंबर २०१६ मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो.
शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकनेते अॅग्रो इंडस्ट्रीजची निर्मिती केली.शिवाय मोहोळ तालुक्यातील युवकांची शैक्षणिक विवंचना थांबण्यासाठी अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आज या संस्थेत पाचवी पासून सिनिअर कॉलेज पर्यंत कला व विज्ञान शाखेची सोय झाली आहे….
लेखक-राजन बाबुराव पाटील..