माढा: माढा तालुक्यातील माढा-वैराग मार्गावर एका दुचाकी अपघातात एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. केवड आश्रमशाळेजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेश्मा दत्तात्रय सुतार आपल्या भाच्याच्या बाइकवर मागे बसून माहेरी जात होत्या. मात्र, अचानक त्या गाडीवरून पडल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

वडाचीवाडी (माढा) येथून धनंजय सुतार हा मामीला व त्यांच्या एका लहान मुलाला (4) गौडगाव बार्शीला दिवाळी निमित्त सोडण्यास मोटरसायकल वरुन जात होता. या दरम्यान, असताना माढा वैराग मार्गावरील केवड आश्रमशाळेसमोरील गतिरोधक वरुन पुढे जाताना रेश्मा यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर खाली कोसळल्या.

खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. माढा ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद बोबडे यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असे घोषित केले.
दिवाळीनिमित्त आपल्या गावी जाण्याची सर्वांनाच घाई आहे. गावी जाणे आणि आपल्या गावी परतणे असे प्रवास सुरूच आहेत. मात्र, सणासुदीसह इतर वेळी सुद्धा वाहने सावकाश आणि संयमाने चालवणे हाच एक उपाय आहे. दरम्यान, याच बाइकवर असलेला त्यांचा लहान मुलगा आणि भाचा सुखरूप आहेत.