मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढत चालले आहे. मात्र, त्याच दरम्यान राज्यातील काही भागांत कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचं दिसत आहे. कोरोना संकटाच्या काळात रात्रंदिवस रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही कोरोना होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २३६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

आतापर्यंत एकूण ८९५८ पोलिसांना कोरोना
राज्यात कोरोना संकट असताना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील एकूण ८९५८ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ६,९६२ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,८९८ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत
पोलीस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३३ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३४, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २ ठाणे २ पोलीस व ठाणे ग्रामीण १ अधिकारी २, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना पोलीस अधिकारी १, उस्मानाबाद १ अशा ५४ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.