सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली 21 वर , सारीचेही 2 रुग्ण आढळले

0
67

सोलापूर शहर पोलिसांचा कडक बंदोबस्त; कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली…!!

सोलापूर: सोलापूर शहरातील बापुजीनगर, कुर्बान हुसेन नगर,  जगन्नाथ नगर, भद्रावती पेठ या भागात आज (सोमवारी) नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 15 वरून 21 झाली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नव्याने भर पडलेल्या सहा रुग्णांमध्ये तेलंगी पछा पेठ परिसरातील दोन रुग्णांचा समावेश आहे. बापुजीनगर, कुर्बान हुसेन नगर, हैदराबाद रोड, शेळगीतील आयोध्यानगर हा परिसर जिल्हा प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 778 जण सध्या आयसोलेशन वॉर्डात असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 569 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.

त्यापैकी 548 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 21 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. उर्वरित 19 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज नव्याने भर पडलेल्या सहा रुग्णांमध्ये दोन रुग्ण ही सारी आजाराशी निगडित असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी सकाळी शहरातील बापूजी नगर, कुर्बान हुसेन झोपडपट्टी, शेळगी आणि हैदराबाद रोडवरील अयोध्या नगर हा भाग पोलिसांनी सील केला आहे.

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर तेलंगी पाच्छापेठ, रविवार पेठ, इंदिरा नगर हा भाग देखील सील केल्यानंतर सोमवारी सकाळी सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्बान हुसेन नगर झोपडपट्टी, बापूजी नगर, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अयोध्या नगर आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळगी हा परिसर पोलिसांनी सील केला आहे. या भागातील काही रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशावरून परिसरात सेटिंग लावून पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हा परिसर सील केला आहे.

सकाळपासून पोलिसांनी या भागात असलेले सर्व रस्ते लोखंडी बॅरिकेड्स व लोखंडी अँगल लावून बंद केले आहेत. या भागातील अत्यावश्यक सेवा देणारी सर्व दुकाने मेडिकल हॉस्पिटल बंद करण्यास सांगितले आहे. परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर येऊ दिले जात नाही. बाहेरील लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस व्हॅनमधून फिरून लोकांना बाहेर न येता घरात बसण्याचा सल्ला देत आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही भाग सील करण्यात आले आहेत. ज्या भागाला सील करण्यात आले आहे, त्या भागातील काही रुग्ण सध्या उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. त्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसर संपूर्णतः सील करण्यात आला आहे.

  • अंकुश शिंदे,

पोलीस आयुक्त, सोलापूर शहर