सायकल मिळाली शाळा जवळ झाली ; सायकल बँक’ मधून स्वप्नांना लाभले पंख
-हजारो मुलींचे वेळ आणि श्रम वाचले
अमोल सिताफळे
सोलापूर : शहरातील प्रत्येक इमारतीच्या पार्किंगमध्ये अनेक सायकली धूळ खात पडलेल्या, हे चित्र एका बाजूला, तर ग्रामीण दुनियेत मुलांना शाळेत जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट असे विरोधाभासाचे चित्र दुसऱ्या बाजूला दिसते. ही दरी भरून काढण्यासाठी केलेला कुर्डू येथील हिंदवी शिक्षण समूहाने ‘सायकल बँक’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे आज हजारो मुलींना शाळेत जाण्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत.

ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी कोणतेही पर्यायी साधन उपलब्ध नसते. शाळा दूर असल्याने अनेक मुली शाळेस वारंवार गैरहजर राहतात. त्याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतो. मुलींची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सुरुवातीला जुनी सायकल दुरुस्ती करून मुलींना देण्यात आल्या. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना तुमची सायकल देणार का? असे आव्हान करण्यात आले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. संस्थेचा हा उपक्रम पाहून काही दानशुरांनी नव्या सायकली भेट दिल्या.

हिंदवी परिवाराच्या वतीने कन्यादान योजना राबविले जाते. या योजनेअंतर्गत पुढे जुन्या सायकली ऐवजी नव्या कोरी सायकली भेट देण्यास सुरुवात झाली. हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे राबविला जातोय. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शेकडो सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. शाळेपासून दोन किलोमीटर अंतरावर दूर असलेल्या मुलींना या सायकली दिल्या जातात. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या या अनुकरणीय उपक्रमाचे सर्वत्र आज कौतुक होत आहे .

संस्थेचे आध्यक्ष संतोष कापरे सांगतात, गरजु मुलींना सायकल मिळाल्याने त्यांचे चालण्याचे श्रम आणि वेळही वाचला. त्यांच्या आयुष्याला गती मिळाली. सायकल मिळाल्यानंतर मुलींच्या चेहर्यांवरचा आनंद तो कोणत्याही शब्दात व्यक्त न करता येणार अाहे. कुर्डू, भोसरे, कुर्डूवाडी, भेंड, वरवडे, परीते, टेंभुर्णी, ढवळस, या गावातील मुलींनी याचा लाभ घेतला अाहे. सायकलच्या रूपात ‘तिच्या’ स्वप्नांना पंख मिळाले. अाज ही सायकल शिक्षणाची गरज आणि प्रसंगी असणारी ही ओढ या मुलींना शाळांकडे खेचून आणते.
मुलींना मिळणार सायकल भेट
जय गणेश सामाजिक बहुद्देशीय संस्था हिंदवी परिवार कुर्डू यांच्यावतीने जानेवारी २०२० मध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचे औचित्य साधून ११ हजार मुलींना सायकल वाटण्याचा संकल्प केला आहे. या सायकलचे वाटप तीन टप्प्यात होणार आहे. गरजू विद्यार्थिनींचा शोध घेऊन त्यांना ती उपलब्ध करून दिले जाईल.
