श्रीमंत व उच्च शिक्षित महिलांना प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यांची फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक
पुणे – श्रीमंत कुटुंबातील महिला व आयटी कंपनीतील चांगल्या पगारावर काम करणाऱ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देत चोऱ्या करणाऱ्या उच्चशिक्षीत व हॉटेल व्यवसाय करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने सापळा रचून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १ कोटी ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अनिकेत सुरेंद्र बुबणे (वय -३०, धंदा – हॉटेल व्यवसायिक, रा. स. नं.२०/२१, श्री कृपा अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी, पुणे), असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
आरोपी बुबणे याने फियादी यांच्या घरातील महिलेस पूर्वीच्या प्रेमप्रकरणाचा गैरफायदा घेत अब्रुनुकसानीची धमकी दिली होती. तसेच त्यांच्या घरातून १ कोटी ७४ लाख रुपयांची चोरी केली होती.
यानंतर बुबणे फरार झाला होता. उच्चशिक्षीत असल्याने गुन्ह्याचा कोणताही पुरावा तो मागे ठेवत नव्हता. तसेच त्याने आपले सर्व जुने मोबाईल नंबर बंद ठेवले होते. त्यामुळे त्याचा शोध घेण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या.
या पार्शभूमीवर युनिट-5 चे सहायक पोलीस निरीक्षक तासगांवकर आणि पोलीस हवालदार राजेश रणसिंग यांनी तांत्रिक विश्लेषनाचा अभ्यास करुन आरोपीच्या अनेक मैत्रिणींना शोधून काढले.
त्यांना विश्वासात घेत आरोपीचा खरा चेहरा समजावुन सांगितला. नेमक्या याच गोष्टीचा आरोपीला जेरबंद करण्यात फायदा झाला.
दरम्यान, पोलीस तपास सुरु असताना आरोपीने त्याच्या एका जुन्या मैत्रिणीला संपर्क केला. त्यामुळे पोलीस पथकाला त्याचा ठावठिकाणा सापडला.त्यानुसार युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी आरोपीस अटक करण्यासाठी युनिटकडील दोन पथके तयार केली.
त्यानंतर आरोपीस त्याच्या मैत्रिणी मार्फत संपर्क साधून बाणेर भागात भेटावयास बोलाविले. ठरलेल्या प्लॅन प्रमाणे आज, शनिवारी आरोपी बाणेर येथे दिलेल्या ठिकाणी मैत्रिणीला भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.
आरोपीकडून ९८ लाख १० हजार ५०० रुपयांची रोकड, गुन्हयात वापरलेली ९ लाखांची डस्टर कार व इतर साहित्य असा एकूण एक कोटी ८ लाख ३० हजार ५०० रुयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलीस चौकशीत आरोपीने अनेक मुलींना फसविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पीडित महिला आणि मुलींनी पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुध्द पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी केले आहे.
अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, तसेच पोलीस कर्मचारी प्रदीप सुर्वे, संतोष मोहिते, दत्ता काटम, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, अमजद पठाण, सचिन घोलप, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, अश्रुबा मोराळे, प्रमोद घाडगे, दया शेगर, सतिश वणवे, अंकुश जोगदंडे, प्रमोद गायकवाड, संजयकुमार दळवी, महिला पोलीस शिपाई स्नेहल जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
