तेलंगणा राज्यातील एका शेतकऱ्याला शेतात नांगरणी करताना सोने आणि मौल्यवान रत्नाचा खजाना सापडला आहे. शेतकऱ्याला जमिनीतून सोने, मौल्यवान रत्न यासह अन्य दुर्मिळ दागिने, चांदीच्या माळा आणि तांब्याच्या वस्तू सापडल्या आहेत. सांगारेड्डी जिल्ह्यातील जहिराबाद येथील येर्रागद्दापल्ली गावात ही घटना घडली असून याकूब अली असे शेतकऱ्याचे नाव आहे.

खरिपाच्या हंगामासाठी शेतात नांगरणी करताना नांगराचे फाळके कशाला तरी अडकले. शेतकऱ्याने पुन्हा जोर लावला, मात्र नांगर पुन्हा अडकला. याकूबने त्या जागी थोडे खोदकाम करून पाहिले असता त्याला सुखद धक्काच बसला. सुरुवातीला तिथे तीन कांस्य धातूचे तीन भांडे मिळाले. यात सोने, चांदीचे दागिने आणि मौल्यवान रत्न होते. तसेच काही तांब्याच्या अँटिक वस्तूही आढळल्या.
याकूब अली याने कोणताही मोह न धरता तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. स्थानिक पोलीस आणि रिव्हेन्यू अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गावातील नागरिकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनीही याकूबच्या शेतावर गर्दी केली.


याठिकाणी अधिक खोदकाम केले असता सोन्याची 25 नाणी, गळ्यातील अलंकार, अंगठ्या आणि पारंपरिक भांडी मिळाली आहेत. हा सर्व खजाना पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आला आहे. विशेषज्ञ याची तपासणी करून हे नक्की कोणत्या काळातील आहेत याचा शोध घेत आहेत.
जहिराबाद महाराष्ट्रमधील संभाजीनगर जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. संभाजीनगर निजामाची पहिली राजधानी होती. या भागात अनेक धनाढ्य लोक राहात होते. कोहिनूर हिरा देखील गोलकुंडाच्या खाणीत सापडला होता. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात सापडलेला खजाना देखील याच काळातला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.