शेट्टी आमदार होताच स्वाभिमानी संघटनेत फूट पडण्याची शक्यता
शिवसेना पक्षाने आपल्या जुन्या मित्रपक्षाची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा हात धरत राज्यात महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकते अशी शक्यता आता राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यातील वाद राज्याला माहितच आहे. पण, आता खुद्द राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची बारामतीत गोविंद बागेत जाऊन भेट घेतली होती.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी राजू शेट्टी यांच नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतःच्या कोट्यातून शेट्टी यांनी उमेदवारी देऊ केली आहे. मात्र राजू शेट्टी यांनी आपल्या राजीकीय आयुष्यात ज्या गोविंद बागेच्या बाहेर पवारांच्या विरोधात अनेक आंदोलन केले तिथच आज राजू शेट्टी यांनी आमदारकी स्वीकारल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

दरम्यान, शेट्टी यांनी ऊसदराच्या मुद्द्यावरून सहा वर्षांपूर्वी गोविंद बागेत जाऊन आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची खूप चर्चा देखील झाली होती. त्याच गोविंद बागेत आज त्यांनी पवारांचा आमदारकीचा प्रस्ताव स्वीकारला आहे.
मात्र आता राजू शेट्टी एकीकडे आमदार होत असताना त्यांच्या संघटनेला सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शिरोळ विधानसभेची निवडणूक लढवलेले सावकार मादनाईक आणि राधानगरीमधून निवडणूक लढलेले संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी शेट्टी यांच्या विधानपरिषदेबाबतच्या मुद्द्यावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
शेट्टी यांनी विधानसभा, लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी आता विधानपरिषद सदस्यसाठी मादनाईक किंवा पाटील यांच्या नावाला मान्यता द्यावी, अशी मागणी दोघांनी केली होती. मात्र, राज्यपाल कोठ्यातील पात्रतेचे निकष पुढे करून शेट्टी यांनी स्वतःकडे ही जागा घेतली असे म्हणत या दोघांनी नाराजी व्यक्त केली आहे.
टाळेबंदीचा कालावधी संपला की याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सूचक विधान करीत त्यांनी संभाव्य बंडाचे निशाण रोवले आहे. दरम्यान, संघटनेतील या वादावर बोलण्यास राजू शेट्टी यांचा नकार दिला असून लवकरच सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया मांडणार असल्याचं त्यांनी सांगितल आहे.