ग्लोबल न्यूज- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 6 जून रोजी रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा मोजक्या लोकांमध्ये पार पडणार असून कोणीही रायगडावर न येता घरातच राहून राज्याभिषेक साजरा करावा, असं आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.

अखिल भारतीय राज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे यांनी यावर्षीचा शिवराज्याभिषेक विविध उपक्रमांनी घरात राहूनच साजरा करावा असे आवाहन केले आहे.
संभाजीराजे म्हणाले, स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा. शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे. स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.

शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
‘एकच धून सहा जून’ असं म्हणत दरवर्षी अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो.
या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावत असतात. यंदा मात्र शिवभक्तांना कोरोनामुळे रायगडावर न येण्याचे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.