विधान परिषद : राष्ट्रवादी काँग्रेस कडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

0
159

विधान परिषद : राष्ट्रवादी काँग्रेस कडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणुक होत असून,या निवडणुकीसाठी शिवसेना वगळता सर्वच पक्षांत रस्सीखेच असल्याचे चित्र आहे.राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा येत असल्या तरी यासाठी डझनभर इच्छूक आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नव्या चेह-यांना संधी देण्याची मागणी होत असली तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शशिकांत शिंदे,अमोल मिटकरी,हेमंत टकले,रविंद्र पगार,राजन पाटील यांची नावे चर्चेत असली तरी माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणुक होत आहे. पक्षीयबलाबलानुसार या ९ जागांपैकी पाच जागा महाराष्ट्र विकास आघाडीच्या तर चार जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे.शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गो-हे यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये इच्छूकांची संख्या मोठी आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री  नसीम खान आणि सचिन सावंत यांच्या नावाची चर्चा आहे.उमेदवारांच्या निवडीसाठी राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांची बैठक काल पार पडली.

मात्र या बैठकीत उमेदवारांच्या नावांबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.माजी मंत्री शशिकांत शिंदे,महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर,यांच्यासह प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी,खजिनदार हेमंत टकले,नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार,सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजन पाटील यांचेही नावे शर्यंतीत असली तरी शरद पवार यांचे विश्वासू  शशिकंत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेले माजी मंत्री एकनाथ खडसे,विनोद तावडे,चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून उमेदवारी नाकारली आहे.

भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

एका जागेवर निवडून येण्यासाठी २९ मतांची आवश्यकता आहे.त्यामुळे नऊ जागांवर नऊच उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

सध्या विधानसभेत असणारे  पक्षीय बलाबल

भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३