राजू शेट्टी यांना शरद पवारांकडून आमदारकीची ऑफर…!
ग्लोबल न्यूज : महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या १२ जागा रिकाम्या होत आहे. कला, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेत १२ सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.

अशात विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांना ऑफर आली आहे. त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: शिरोळला येऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा निरोप देऊन गेले आहेत. ही ऑफर स्वीकारून स्वत: शेट्टी हे विधानपरिषदेवर जाणार की अन्य कुणाला संधी देणार, याबाबतचा निर्णय झालेला नाही.
राष्ट्रवादीकडून मात्र ही ऑफर देताना या जागेवर शेट्टी यांनीच जावे, अशी अट घातली आहे. शेट्टी नसतील तर संघटनेकडे अनिल मादनाईक, प्रा.जालंदर पाटील, रविकांत तूपकर ही पर्यायी नावे आहेत. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण १२ जागा भरायच्या आहेत. त्यातील किमान चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतात. शेट्टी यांच्यासारखा लढाऊ नेता विधानपरिषदेत जावा अशी स्वत: शरद पवार यांचीच भूमिका असल्याचे पाटील यांनीही स्पष्ट केले आहे.