नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दुसऱ्यांदा सत्तेत येऊन आज वर्षपूर्ती झाली आहे. या त्यानिमित्ताने पंतप्रधानांनी देशवासियांसोबत पत्राद्वारे संवाद साधला आहे. या एक वर्षाच्या काळात केंद्र सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. यात कलम ३७० रद्द करणे, राम मंदिरचा प्रश्न, तिहेरी तलाक रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, यांचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

वर्षभरात केंद्राने केलेल्या कामाचा आढावा पंतप्रधान मोदींनी या पत्रामध्ये घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, २०१९ मध्ये आपल्या आणि जनतेचे आशीर्वाद वर्षभरात घेतलेल्या मोठ्या निर्णयांसाठी होते.

“सर्जिकल स्ट्राईक करून भारताने आपले सामर्थ्य दाखवून दिले. वन रँक वन पेन्शन, वस्तू व सेवा कर कायदा आणि शेतकऱ्यांना किमान हमीभाव यासारखे बऱ्याच वर्षांपासून खितपत पडलेले प्रश्न मार्गी लावले. हे प्रयत्न निरंतर सुरु ठेवण्यासाठी जनतेने २०१९ मध्ये जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले”. असेही मोदींनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे छोटे उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर काही बंद पडले. अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरीनं प्रयत्न करीत आहोत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पत्रात म्हटले आहे.