कोरोनाच्या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. मृत्यू दारात उभा आहे. अशा भयंकर संकटाच्या वेळी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी काही मंडळी राजभवनाचे उंबरठे झिजवून गलीच्छ राजकारण करीत असून सरकारला अडचणीत आणण्याचे कारस्थान करीत आहेत. याचा मला खूप खेद वाटतो अन् मनस्वी संतापही येतो, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या सूर्यकांता पाटील यांनी आपल्याच स्वकीयांवर जबरदस्त आसूड ओढला. सूर्यकांता पाटील यांनी दिलेल्या या घरच्या आहेरामुळे भाजपच्या घाणेरड्या राजकारणाची राज्यभरात छिथू: होत आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यात महाविकास आघाडीच्या सरकारला अपयश आल्याचा कांगावा करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींनी राज्यात आणीबाणी लागू करावी, अशी कोल्हेकुई करत राजभवनाच्या खेट्या घातल्या. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी फेसबुकवर आपल्या भावना मोकळ्या केल्या. आज ‘सामना’ प्रतिनिधीनेही त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाच्या सत्तापिपासू राजकारणावर जोरदार घणाघात केला.
त्या म्हणाल्या, एकीकडे राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या जीवाचा घोर लागला आहे. मरण दारात उभे आहे. अशा कठीण प्रसंगात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिवाचे रान करत आहेत. आपल्या आजपर्यंतच्या अनुभवाचा फायदा घेत ते राज्यात मोठ्या प्रमाणावर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. अशा वेळी ज्यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगले, ज्यांना अनुभव आहे अशा मंडळींनी आपल्या अनुभवाचा फायदा सरकारला देणे अपेक्षित आहे. मात्र राजभवनाचे उंबरठे झिजवून ही मंडळी गलीच्छ राजकारण करत असल्याबद्दल सूर्यकांता पाटील यांनी जाहीर संताप व्यक्त केला. सरकार अस्थिर करण्याच्या या कारस्थानाची कीव करावी वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला.

राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी शोभून दिसते. मात्र संकटाच्या वेळी सर्वांनी मिळून त्याला तोंड देणे अपेक्षित असताना राज्यात जे काही घडते आहे त्याने मनाला अतिशय वेदना होतात. हे सर्व पाहून राजकारणात राहावे की नाही असा प्रश्न पडतो, असे सांगून आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करू, असे सूर्यकांता पाटील यांनी स्पष्ट केले.

गलीच्छ राजकारणामुळे नाराजी
आपल्याच स्वकीयांकडून सुरू असलेल्या गलीच्छ राजकारणामुळे नाराज असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी फेसबुकवर मन मोकळे केले मात्र त्या राजकारण सन्यास घेणार असा त्याचा अर्थ लावण्यात आला. मात्र त्यांनी स्पष्ट केले की, आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच याविषयी निर्णय घेऊ. यापुढे आपण नव्या पिढीचे नेतृत्व घडवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांसाठी आपले दरवाजे सदैव उघडे असतील, असे म्हटले आहे.

सूर्यकांता पाटील या मूळच्या काँग्रेसी. बराच काळ काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर त्यांना डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास व संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सूर्यकांता पाटील या तीन वेळा लोकसभेवर आणि एकदा विधानसभेवर निवडून आल्या. शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. सूर्यकांता पाटील यांनीही काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2013 मध्ये नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने त्यांच्याऐवजी रामराव वडकुते यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. भाजपने त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली होती.