
मी अनेकदा बारामतीत गेलो, मला तिथेही समुद्र दिसला नाही- देवेंद्र फडणवीस
रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवस कोकणचा दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सिनीअरवर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला. देवेंद्र फडणवीस आज कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.
कोकणात किती नुकसान झालं आहे, हे सर्वांना कळलं पाहिजे. प्रत्येकजण वेगवेगळ्या भागतून येतो. मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत, तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल,असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी विदर्भामधला आहे, त्यामुळे समुद्राशी काहीही संबंध नाही असं शरद पवार म्हणाले आहे. पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे.
