ग्लोबल न्यूज – मित्रांनो, मी बरा आहे. काळजी करू नका. कोणी कसलाही त्रास करून घेऊ नका. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे अन्नत्याग, पायपीट, नवस असे स्वतःला इजा करणारे कृत्य करू नका, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कोविड वॉर्डमधून केले आहे.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
त्यांच्या तब्यतेची सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे समर्थक उपवास करत आहेत. काहीजण नवस-पायी वाऱ्या करत आहेत, तर कोणी मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यापार्श्वभुमीवर मुंडे यांनी फेसबुकद्वारे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे.


‘मी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्यातील काही जणांकडून विविध प्रकारे प्रार्थना केल्या जात आहेत. काहीजण उपवास करत आहेत.
काहीजण नवस-पायी वाऱ्या करत आहेत, तुम्हा सर्वांचे माझ्यावरील ऋण वाढतच जात आहेत. पण, सहकाऱ्यांनो असे काहीही करू नका. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा-आशीर्वादाने मी ठणठणीत बरा होऊन येणार आहे.

कोणीही पायी चालत जाणे. उपवास करणे असे काहीही करू नका, माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला कसा बरा वाटेल?’, असेही त्यांनी म्हटले आहे.