ग्लोबल न्यूज – देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. मागील 24 तासांत देशात आजवरची सर्वाधिक 19,906 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली असून 410 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 लाख पेक्षा अधिक रुग्ण संख्येसह मोठी रुग्णसंख्या असलेला भारत हा चौथा देश आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 410 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची एकूण संख्या 16,095 झाली आहे. 3,09,713 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर 2,03,713 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 58 टक्के झाले असून मृत्यूचे प्रमाण 3 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
देशभरात महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. या राज्यांमध्ये अनुक्रमे 1 लाख 52 हजार 765, 77 हजार 240, 74 हजार 622 रुग्णांची नोंद झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 79,96,707 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासांत 2,20,479 नमुना चाचण्या करण्यात आल्याचे शनिवारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 8 राज्यांमध्ये देशातील 85 टक्के करोना रुग्ण आणि 87 टक्के मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी कोरोनाविषयक मंत्रिगटाच्या 17 व्या बैठकीत देण्यात आली. या राज्यांमध्ये 15 केंद्रीय पथके राज्यांना तांत्रिक मदत देण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.
कोरोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्येही काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरलं जाणार आहे.
