पुण्यात तब्बल ८७ कोटी रूपयांच्या बनावट नोटांसह ४ कोटी बनावट अमेरिकन डॉलर जप्त
पुणे – बनावट चलनी नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात लष्करी गुप्तचर यंत्रणा व पुणे पोलिसांना यश आले आहे. बनावट नोटा वठवणाऱ्या सहाजणांच्या टोळीला जेरबंद करीत पोलिसांनी तब्बल ८७ कोटी रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा आणि चार कोटी २० लाख अमेरिकन अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत. दरम्यान, बनावट नोटा मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लष्करी गुप्तचर यंत्रणेबरोबर पुण्यात ही संयुक्त कारवाई केली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका लष्करी जवानाचाही समावेश असल्याचे समजते.
आतापर्यंत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. शेख अलीम गुलाब खान, सुनील बद्रीनारायण सारडा, रितेश रत्नाकर, तुफैल अहमद मोहम्मद इश्क खान, अब्दुल गणी रेहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गानी खान अशी त्यांची नावे आहेत.
बनावट चलनी नोटांच्या संदर्भात लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना कारवाई संदर्भात नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा पुणे यांच्या वतीने लष्करी गुप्तचर टीमबरोबर नियोजन करून बुधवारी (दि. १०) एक संयुक्त कारवाई करण्यात आली.

या ऑपरेशनमध्ये बनावट भारतीय आणि विदेशी चलन बाळगल्याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले. यामध्ये एका लष्करी जवानाचा देखील समावेश आहे.
या संयुक्त ऑपरेशनसाठी युनिट 4 आणि एएनसी पश्चिमच्या पोलिसांनी लष्करी गुप्तचर टीमबरोबर समन्वय साधत ही कारवाई केली. बनावट चलनी नोटा कोठून आल्या यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.
बहुतांश नोटांवर ‘चिल्ड्रेन्स बँक इंडिया’चे चिन्ह
जप्त केलेल्या बनावट नोटांची मोजणी केली असता, विविध रकमेच्या नोटांमधील ८७ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन, तर ४ कोटी २० लाख डॉलर्स इतके बनावट अमेरिकन चलन असल्याचे स्पष्ट झाले.
तज्ज्ञांकडून या नोटांची गुणवत्ता योग्य वेळी तपासली जाणार आहे. बर्याच नोटांवर ‘चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया’ चिन्हांकित आहे. बनावट नोटा वठवून या टोळीने अनेकांची फसवणूक केली असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.
या नोटा या टोळीला कोठून मिळत होत्या, याचा तपास चालू आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट 4 पुढील तपास करीत आहे.