कोरोना नियंत्रणासाठी एक लाख लोकांची कोरोना टेस्ट करणार
सध्या पुणे शहरात कोरोनाच्या वाढत्या केसेस आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे . पुणे मनपाने 1 लाख नागरिकांची कोव्हिड-19 टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. यासाठी 1 लाख कोरोना चाचणी किट घेण्यात येणार आहेत.

पुणे महानगरपालिका प्रशासनाने कोरोना चाचणीच्या प्रतिकिट 450 रुपये दराने 1 लाख कीटसाठी 4 कोटी 50 लाख रुपयांच्या खरेदीस मान्यता दिली आहे. या किटचा उपयोग फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या, अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या, ह्रदय विकार, फुप्फुस, यकृत मुत्रपिंड विकार, मधुमेह, रक्तदाब विकार असलेल्या, त्याचप्रमाणे केमो थेरपी, एचआयव्ही बाधित, अवयव प्रत्यारोपण केलेले किंवा वयोवृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी करण्यात येईल. त्यांच्यावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयांमध्ये ही तातडीची चाचणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणे शहरात काल दिवसभरात 467 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. दिवसभरात 273 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या शहरात 277 गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात 57 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 153 इतकी झाली आहे.

यातील डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 12 हजार 408 आणि ससून रुग्णालयात 745 रुग्ण आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 4 हजार 680 इतकी आहे. आतापर्यंत पुणे शहरात एकूण 528 मृत्यू झाले आहेत. तर पुणे शहरात उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या 7 हजार 945 इतकी आहे.