पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..

    0
    23

    मुंबई । महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत हा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं.

    त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आहे. ‘कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू असून संपूर्ण जगाला घरात थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील पत्रकार परिषद घेत पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    शाळा महाविद्यालयांच्या दृष्टीने हा मोठा निर्णय  घेण्यात आला आहे. दहावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार सुरु राहणार आहेत, नववी आणि 11 वीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होणार आहेत. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

    ‘रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहिन्या आहेत. त्या बंद करणे सोपं आहे, पण त्या बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर परिणाम होईल. महापालिका कर्मचारी, डॉक्टर यांची ने-आण कशी होईल. तूर्त या दोन सेवा बंद न करता राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थितील 25 टक्क्यांवर आणली आहे. यापूर्वी ती 50 टक्क्यांवर आणली होती. मुंबई महानगर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी बंद. ही बंदी 31 मार्चपर्यंत असेल’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

    ‘संकट येतं आणि जातं. पण, माणुसकी सोडू नका. हे संकट जाईल. त्यामुळे ज्याचं पोट हातावर आहे, त्याचं किमान वेतन कापू नका’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रातील उद्योजकांना आणि उद्योगांना आवाहन केलं आहे. तसेच सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. कारण सध्या तरी संपर्क आणि संसर्ग टाळण्याशिवाय काहीही पर्याय नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, चीनमधील व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली आहे. तसेच, पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे.