निसर्ग चक्रीवादळाच्या संदर्भात अमित शहा यांच्या मुख्यमंत्री ठाकरेंना फोन
सुरज गायकवाड
ग्लोबल न्युज: निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरेंसद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्ती कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकर द्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत.

मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.