देशभरात चर्चेला उधाण आलेल्या निझामोद्दीन मर्कज प्रकरणावर संजय राऊत यांची रोखठोक प्रतिक्रिया…

0
49

निजामुद्दीनच्या मरकजला जमणारे फितूर, त्यांना सोडू नये : संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाला युद्ध मानतात . हे युद्ध लढत असताना दिल्लीत शेकडो लोक एकत्र येतात. ते फितूर होते. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांनाही फितूरच म्हटलं पाहिजे. या लोकांना सोडू नये, असं मत शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातच्या कार्यक्रमावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

“दिल्लीसारख्या शहरात 144 कलम लागू असताना इतके लोक जमतात. त्यानंतर तिथून काही लोक महाराष्ट्रात येतात आणि ते कोरोना पॉझिटिव्ह निघतात. हे चिंता वाढवणारं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणी केली. त्यांच्या घोषणेनुसार कारवाईदेखील झाली. प्रत्येक राज्याने कठोर निर्णय घेतले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नाकासमोर हजारो लोकं जमतात.

विशेष म्हणजे संपूर्ण देशभरातील लोकं इथे जमतात, राहतात, एकत्र होतात आणि जाताना परत आपापल्या राज्यात कोरोना घेऊन जातात. हा निष्काळजीपणा, अमानुषता आणि निघृणपणा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कारवाई होईलच, पण हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे तीन यंत्रणा जबाबदार आहेत. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजकांना दिल्ली महापालिकेची परवानगी मिळाली असेल. त्यांना दिल्ली सरकारकडून काहीतरी मदत झाली असणार. इतक्या लोकांची राहण्याची आणि खाण्याची सुविधा करण्यात आली. पोलिसांनीही परवानगी दिली. पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात. पोलीस, महापालिका आणि सरकार काय करत होते?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

“या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप करणारे या देशाच्या भवितव्याशी खेळत आहेत. हा आरोप-प्रत्यारोप नाही तर गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. हा गुन्हा ज्यांनी केला त्यांना कुणीही पाठिशी घालू नये. ते कुठल्या धर्माचे आणि समाजाचे आहेत ते सोडून द्या”, असं संजय राऊत म्हणाले.