भयाण वास्तव : 15 दिवसांत 10 जण कोरोनामुळे तर इतर आजारांमुळे 7 जणांचा मृत्यू
भूम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण रुग्णसंख्या अधिकच्या प्रमाणात आहे. तालुक्यातील देवळाली गावात तर कोरोनाचा कहर झाला असून गेल्या 15 दिवसांमध्ये 10 जणांचा कोरोनामुळे तर 7 जणांचा इतर आजारामुळे मृत्यू झाला आहे. अंत्यविधीलाही कोणी येण्यास धजावत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच अंत्यविधीची जबाबदारी येऊन ठेपली आहे.
तालुक्यातील देवळाली गावामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. गत आठवड्यात तब्बल 74 जणांवर उपचार सुरू होते तर यापैकी 10 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी तर घरातील सर्वच सदस्य हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तरी अंत्यविधीची करायचा कोणी हा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, ही जबाबदारी गावचे उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी घेतली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यामध्ये ज्येष्ठासह तरुणांचाही समावेश होता. त्यामुळे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावची लोकसंख्या 3 हजार 500 असून 40 टक्के ग्रामस्थ हे आता शेतामध्ये वास्तव्यास गेले आहेत. उपचार घेत असताना मृत्यू झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी तर त्या ठिकाणीच होत आहे पण इतर आजाराने मृत्यू झाला तरी अंत्यविधीला कोणी धजावत नाही अशी अवस्था झाली आहे. मात्र, याची जबाबदारी गावाचे उपसरपंच सागर खराडे, सदस्य समाधान सातव आणि युवराज तांबे यांनी घेतली आहे. रुग्णांच्या देखभालीसह त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत या दृष्टीने हे लोकप्रतिनिधी गेल्या 15 दिवसांपासून राबत आहेत. गावात कमालीचा शुकशुकाट असून जीवन आवश्यक वस्तूही मिळणे आता अवघड झाले आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावबंदी करण्यात आली आहे तर कामाशिवाय ग्रामस्थांना बाहेर पडू दिले जात नाही.
चौकाचौकात बंदोबस्त
दुसऱ्या लाटेत सुरवातीला ग्रामस्थांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाला गांभीर्याने घेतले नाही. परिणामी 15 दिवसांमध्ये 74 रुग्ण आढळून आले. शिवाय आजार अंगावर काढल्याने गंभीर स्थितीमध्ये रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असल्याचा संशय व्यक्त होतोय.

लोकप्रतिनिधी यांची पराकाष्ठा…
देवळाली गाव हे भूम तालुक्यात असले तरी उपचाराच्या दृष्टीने बार्शी शहर हे जवळ केले जाते. शिवाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले तर त्यांना भूम येथील ग्रामीण रुग्णालय किंवा गोलेगाव कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते. याकरिता ग्रा. प. सदस्य समाधान सातव, युवराज तांबे हे भूममध्ये रुग्णसेवा करीत आहेत तर उपसरपंच सागर खराडे बार्शी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची काळजी घेत आहेत.
ग्रामस्थांमध्ये घबराहट
देवळाली सारख्या ग्रामीण भागात दिवसागणिक एकाचा मृत्यू होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे सत्र सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घाबराहट निर्माण झाली आहे. अनेकजण शेतामध्येच राहण्यास गेले आहेत. इतर आजाराने मृत्यू झाला तरी अंत्यविधीलाही येण्यास ग्रामस्थ धजावत नाहीत. शनिवारी एकाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. आशा परस्थितीमध्ये उपसरपंच सागर खराडे, सदस्य समाधान सातव आणि युवराज तांबे यांनी पीपीई किट घालून अंत्यसंस्कार केले.