ग्लोबल न्यूज- राज्यातील बारावीचा निकाल जुलैच्या मध्यापर्यंत तर दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. त्यामुळे अफवांना पीक फुटले होते. अखेर शालेय शिक्षणमंत्री वर्षी गायकवाड यांनीच यावर पडदा टाकला आहे.

वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी (दि.16) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही माहिती दिली.

दहावीची परीक्षा अंतिम टप्प्यात असतानाच राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द कारावा लागला होता. त्याचे गुण विद्यार्थ्यांना सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत. त्यातच नंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने पेपर तपासणीचे काम ही उशिराने सुरु झाले.

त्यामुळे एरवी मे अखेरीस आणि जून महिन्यांत लागणारा निकाल आता जुलैपर्यंत पुढे गेला आहे. मूल्यांकन प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच बारावीचा निकाल जुलैच्या मध्यापर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.