ते वक्तव्य इंदुरीकर महाराजांना भोवले ; न्यायालयात गुन्हा दाखल

0
575

कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी कीर्तनातून प्रसुतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. संगमनेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही फिर्याद दिली आहे.

‘सम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगा होतो व विषम तिथीला मुलगी,’ असे वक्तव्य केल्यामुळे इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेथे झालेल्या निर्णयानुसार ही तक्रार दाखल झाली.

या प्रकरणानंतर इंदुरीकर महाराजांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते माझी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा लेखी खुलासा त्यांनी केला होता.

मधल्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याचा पाठपुरावा सुरू केला. समितीच्या जिल्हाध्यक्ष ऍड. रंजना गावंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून सविस्तर निवेदन दिले. सोबत पेन ड्राईव्ह व सीडीद्वारे पुरावेही दिले. यानुसार कायद्याचा भंग झाल्याचे आढळून येत असून सरकारी यंत्रणेने कारवाई केली नाही, तर आम्ही पुढील कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशाराही गवांदे यांनी दिला होता. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील आणि नाशिकचे उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी यांनीही जिल्हा आरोग्य यंत्रणेला या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते.

कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना हे प्रकरण राजकीय आणि सामाजिक पातळीवरही गाजत राहिले. अनेकांनी इंदुरीकरांचे समर्थन केले. ते जे बोलले त्याचा उल्लेख ग्रंथात आहे असे अनेक बचाव करण्यात आला. मधल्या काळात ज्या व्हिडिओ लिंकच्या अधारे हे आरोप होत होते, त्या लिंक आणि व्हिडिओ इंटरनेटवर आढळून येत नसल्याचा अहवाल सायबर पोलिसांनी तपास यंत्रणेला दिला होता. त्यामुळे प्रकरण संपल्यात जमा असल्याचेही मानले जाऊ लागले. तसेच दोन्ही बाजूंनी दबाव वाढत असल्याने यंत्रणेने गोपनीयता पाळून काम सुरू ठेवले.

मात्र, यासंबंधी कोणतेही निर्णय जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत घ्यावे लागतात. त्यानुसार मार्च महिन्यातच या समितीची बैठक 12 मार्च रोजी झाली. या बैठकीत तक्रार, खुलासा, अंनिसने दिलेले व्हिडिओ, वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या, इंदोरीकरांनी दिलेल्या मुलाखती यांचा विचार करण्यात आला. त्यानुसार समितीमधील कायदेशीर तज्ज्ञ, समिती वैद्यकीय अधिकारी आणि अन्य सदस्य या सर्वांनी एकमताने इंदुरीकरांनी सादर केलेला खुलासा फेटाळून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

या कायद्यातील कलम 22 चा भंग केल्याचा गुन्हा संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दाखल करण्यासाठी संगमनेर तालुका वैद्यकीय अधीक्षक यांना प्राधिकृत करण्यात आले. मात्र, मधल्या काळात कोरोनाचा उद्रेक झाल्याने तसेच लॉकडाउन असल्याने पुढील कामकाज ठप्प झाले होते. आता त्याला पुन्हा वेग आला आहे. संगमनेर तालुका वैदयकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद आणि पुराव्याची कागदपत्रे अलीकडेच न्यायालयात दाखल केली आहेत. हे प्रकरण आज कोर्टासमोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होईल.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here