डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरस घेऊन भारतात आले – संजय राऊत
ग्लोबल न्युज: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना हा संसर्ग आजार भारतात घेऊन आले. असा दावा सामानाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या अग्रलेखात केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने लाखोंचा जलसा अहमदाबाद येथे झाला. या कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला”, असे मत आजच्या सामना या अग्रलेखात संजय राऊत यांनी मांडले आहे.

ग्लोबल न्युज:“अमेरिकेतून ट्रम्प यांच्याबरोबर आलेले काही ‘डेलिगेट्स’ मुंबई तसेच दिल्लीतही वावरले आणि संक्रमण झपाट्याने पसरले, ते नाकारता येणार नाही. संक्रमण वाढणे ही चिंता आहे. ही चिंता राष्ट्रव्यापी असायला हवी. महाराष्ट्रात संक्रमण वाढले म्हणून राष्ट्रपती शासन लावा सांगणारे या काळातही राजकारण करतात, हे धक्कादायक आहे”, असंदेखील अग्रलेखात म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. ट्रम्प आपल्या कुटुंबियांसोबत गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर 24 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दाखल झाले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठ्या जल्लोषात विमानतळावर स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर मोठी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटेरा स्टेडिअमवर लाखो लोकांच्या उपस्थितीत ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला गेले होते.