दिनांक : २४ ऑगस्ट ; बुधवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते – गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले.
विषय – संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
ज्ञानाला सोडून भक्ती व भक्तीला सोडून ज्ञान नाही.तर ज्ञान हीच भक्ती आहे-जयवंत बोधले महाराज
बार्शी:भक्ती तत्वाचा प्रसार आणि प्रचार म्हणजे संत होय,* असा विचार गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले प्रवचनमालेच्या २७ व्या दिवशी व्यक्त करतात. संत तुकाराम महाराजांचे चरित्र हे लौकिक नसून आध्यात्मिक आहे. त्यांच्या चरित्रामध्ये भक्तीरस ओतप्रोत भरलेला दिसून येतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात, मला जे अभंग स्फुरण झाले ते नामदेव रायांच्या उपदेशामुळेच होय. या उपदेशामुळे मी आता फार आनंदी आहे. मला आता दु:ख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती झाली आहे.
पिकलिया सेंदे कडूपण गेले।
तैसे आम्हा केले नारायणे।।
आता माझ्या ठिकाणचे काम ,क्रोध निघून गेले आहेत.
एक हरि आत्मा।
जीव शिव समा।।
मला आता सर्व समान दिसत आहे. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात-
अंतरिची ज्योती, प्रकाशली दिप्ती। मुळीची जी होती अच्छादनी।
माझ्या ठिकाणी असलेल्या अविद्येचे अच्छादन माझ्या सद्गुरुंनी काढून टाकले आहे. आता मला ब्रह्मतत्वाची अनुभूती झाली आहे. हे निर्गुण असलेलं ब्रह्मतत्व त्याला सगुण रुपात आणले आहे. तोच ब्रह्मांडनायक माझ्यासमोर येथे विटेवरी पंढरीत उभा आहे.

गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज स्पष्ट करतात, ज्ञानाला सोडून भक्ती व भक्तीला सोडून ज्ञान नाही. ज्ञान हीच भक्ती आहे. स्वस्वरुपाचे संधान जिथे आहे , त्याला भक्ती म्हणतात. ही स्वस्वरुपाची अवस्था संत तुकाराम महाराजांकडे निर्माण झाली होती.
संत तुकाराम महाराजांच्या महत्वपूर्ण अभंगातून गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज ३ गोष्टींचा उलगडा करतात.
१) ज्ञान
२) भक्ती
३) ज्ञानोत्तर भक्ती
सर्वप्रथम संत तुकाराम महाराजांना अद्वैत अवस्था प्राप्त झाली. कुणी स्तुती करो अथवा निंदा करो त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. तुकाराम महाराज आता द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचले आहेत. ज्यांचे द्वंद्व गेले ते खरे संत होय.
एकदा काही खोडपत्री लोकांनी संत तुकाराम महाराजांची फजिती करण्याचे ठरवले. त्यांची टिंगल-टवाळी चालू केली. त्यांना गाढवावर बसवून धिंड काढली गेली. अशा अवस्थेतही तुकाराम महाराजांचा रामकृष्णहरि, रामकृष्णहरि, रामकृष्णहरि,…………….! अखंडपणे नामजप चालूच आहे. कोणी त्यांच्या जवळील विणा घ्यावा, टाळ घ्यावा. परंतु, रामकृष्णहरि बंद नाही. हा लोकांची आरडा-ओरड ऐकून जिजाई घराबाहेर येऊन मोठी अचंबित होते. तुकाराम महाराजांना म्हणते, आपल्याकडून काय अपराध घडला आहे? तुमची अशी गाढवावरुन विचित्रपणे धिंड का काढली?
तुकाराम महाराज म्हणतात- ” अगं आवले , ये ये! आपले लग्न झाले तेव्हा, वरात काढली नव्हती. ही आता आपली वरातच आहे.” तेव्हा, जिजाई म्हणतात, ” अहो, वरात घोड्यावरुन असते, गाढवावरुन नाही. संत तुकाराम महाराज बोलतात-
गाढवाचे घोडे।
आम्ही करु दृष्टी पुढे।।