चिंताजनक देशात कोरोनाचा धोका वाढला ; गेल्या २४ तासांत तब्बल १०,९५६ नवे रुग्ण, पहिल्यांदाच मोठा आकडा
नवी दिल्ली, १२ जून: कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आज सकाळी ९ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात तब्बल १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. तर काल गेल्या २४ तासांत ३९६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. त्यामुळे देशातील कोरोनाबळींची संख्या ८ हजार ४९८ इतकी झाली आहे.

दरम्यान, पहिल्यांदाच देशात एका दिवसात दहा हजाराहून रुग्ण आढळले आहेत. भारतात एकूण १ लाख ४७ हजार १९५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ लाख ४१ हजार ८४२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
भारतात हळहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत असला, तरी वाढत चालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. एका संस्थेनं केलेल्या अभ्यासातून भारतासाची काळजीत भर टाकणारे निष्कर्ष समोर आले आहे.

जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेनं कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील 45 अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. यात भारत ‘डेंजर झोन’मध्ये (धोकायदायक श्रेणी) असल्याचं म्हटलं आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती असून, लॉकडाउन लागू होऊ शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे.