चंद्रकांत दादा कमीत-कमी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगावी –

0
287

चंद्रकांत दादा कमीत-कमी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगावी –

मुंबई : कोकणात निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्यावर टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

१९७२ साली दुष्काळ असो की, १९९३ चा बॉम्बस्फोट,किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा तिथल्या जिल्हाधिका-यांना कळण्याच्या आत पवार हे किल्लारी ला पोहचले. तेव्हा आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान तरी चंद्रकांत पाटलांनी ठेवावे अशा शब्दात आव्हाड यांनी पाटील यांच्यावर प्रहार केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्या कोकणाच्या दौ-यावर असून, त्यांच्या या दौ-यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी टीका केली आहे.पाटील यांच्या टीकेचा समाचार आव्हाड यांनी घेत चंद्रकांत पाटील जणू काही दौऱ्यावर तत्पर जाणारे गडी आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

१९७२ साली जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा गावा-गावात पोहचले ते शरद पवार,१९९३चा बॉम्बस्फोट झाला आणि त्याचा धुराळा खाली उतरत नाही तर पवार जागेवर पोहचले. किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा तिथल्या जिल्हाधिका-यांना कळण्याच्या आत पवार किल्लारीला पोहचले. तेव्हा आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान तरी चंद्रकांत पाटलांनी ठेवावे असे आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.जेव्हा कोल्हापूर मध्ये पूर आला तेव्हा भाजपाचे नेते कुठे होते याचा शोध तर घ्यावा.त्याही परिस्थितीमध्ये स्वतः शरद पवार दोन फूट पाण्यामधून चालत अंगठ्याला जखम असताना देखील गेले.

आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रावर नाही तर देशावर प्रसंग ओढवला तेव्हा मदतीला धावणारे शरद पवार आहेत. अगदी गुजरातच्या भुकंपात सुद्धा त्यांनी अभुतपुर्व काम केल आणि म्हणुनच स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख बनवले. आपले हेलिकॉप्टर गारा पडतायेत म्हणुन खाली उतरल्यानंतर त्याच अवस्थेत चिखल तुडवत द्राक्षे आणि डाळींबांच्या बागांमध्ये जाणारे शरद पवार होते.

तेव्हा त्यांना दौ-यावर उशीर झाला अस म्हणण हे आपल राजकीय प्रगल्भत्व सिद्ध करते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्वत:ला दाराच्या आत न-ठेवता, वय वर्षे ८० असताना देखील महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, मुंबई मध्ये काय चालू आहे हे पाहण्यासाठी न-घाबरता बाहेर पडणारे ते एकमेव नेते आहेत.

आजही सकाळी ८ वाजल्यापासून लोकांना भेटण्याची त्यांची दिनचर्या खंडीत झालेली नाही अशी आठवणही आव्हाड यांनी पाटलांना करून दिली आहे. म्हणुनच चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबद्दल टीका करण्याच्या आधी कमीत-कमी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगावी असा टोला लगावला आहे.