गंभीर पण खंबीर ठाकरे सरकार: कोरोना चाचण्या करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल!

0
76

मुंबई: करोनाविरोधातील लढाईत जास्तीत जास्त चाचण्या होणे गरजेचे असताना बहुतेक राज्ये अजूनही फारशी गंभीर नसल्याचेच दिसते. मात्र करोनाची चाचणी करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. १८ एप्रिलपर्यंत महाराष्ट्राने देशात सर्वाधिक ५९ हजार १५७ चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ राजस्थानचा क्रमांक असून त्यांनी ४२ हजार ७१८ चाचण्या केल्या आहेत तर तिसऱ्या क्रमांकावरील गुजरातने ३० हजार ७३८ चाचण्या केल्या आहेत.

पंतप्रधानांच्या भाषणानंतरही देशातील अनेक राज्ये गंभीर नसल्याचे चित्र ‘आयसीएमआर’च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. १८ एप्रिल सकाळी आठ वाजेपर्यंतची आकडेवारी ‘आयसीएमआर’ने जाहीर केली आहे. मागील चार आठवडय़ांत देशातील कोणत्या राज्यांनी किती चाचण्या केल्या हे यात नमूद केले आहे. महाराष्ट्राने सर्वाधिक चाचण्या केल्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही जास्त दिसत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये फक्त २६ हजार ९२० चाचण्या करण्यात आल्या तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत फक्त २० हजार १४९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. केवळ सात राज्यांमध्ये २० हजारांहून अधिक करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आंध्र प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक व तेलंगणात तुलनेत कमी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

जम्मू- काश्मीरमध्ये केवळ सहा हजार ९८६ लोकांच्याच करोना चाचणी करण्यात आली असून लक्षद्वीप येथे केवळ सात जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात आज १४ हजार ३७८ रुग्ण करोनाबाधित असून एकटय़ा महाराष्ट्रात तीन ६४८ रुग्ण करोनाबाधित आहेत.

जगातील २०० हून अधिक देशात करोनाची लागण झाली असून अमेरिकेला त्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. अमेरिकतील जॉन हाफकिन्स संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात एप्रिलच्या मध्यावर भारतात अडीच कोटी करोनाचे रुग्ण आढळतील आणि सुमारे २५ लाख लोकांचे मृत्यू होतील असे म्हटले होते.

तथापि, भारताने वेळीच लॉकडाऊन करून आवश्यक ती काळजी घेतल्याने आपल्याकडे लोकसंख्या घनता जास्त असूनही करोनाचा फैलाव जॉन हाफकीन्सच्या इशाऱ्याप्रमाणे झालेला नाही. तथापि जगभरातील विविध देशांनी केलेल्या चाचण्यांच्या तुलनेत भारतात खूपच कमी चाचण्या झाल्या असून महाराष्ट्राने याबाबत सजगता ठेवल्याचे राज्याचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.