कोल्हापुरात झाला जोरदार पाऊस, राजाराम बंधारा गेला पाण्याखाली…!
कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. आता सकाळी ८ वाजता पंचगंगा नदी पाणी पातळी २२.७ फूट आहे. तर जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येत आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावर होणारी बावडा – वडणगे वाहतूक आता ठप्प झाली आहे.

दरम्यान गेल्या चोवीस तासात शहर आणि जिल्ह्यात दमदार पावसाची सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदीला येणाऱ्या पुराचे निकष राजाराम बंधाऱ्यावर मांडले जातात. ४२ फुट पाणी पातळीगेल्यानंतर महापूर समजला जातो.तर ३९ ही धोक्याची पातळी मानली जाते.

अपुराच्या पाण्याचा बंधाऱ्याला धोका पोहोचू नये म्हणून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंचगंगा नदीवर असणाऱ्या सर्वच कोल्हापूर पद्दतीच्या बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्या आहेत. त्यामुळे बंधाऱ्याजवळची पाणी पातळी सहा फूट इतकी खाली गेली होती.
मात्र राधानगरी, तुळशी आणि कुंभी जलाशयामधून पाणी सोडल्यामुळे अवघ्या दोन दिवसात पाणीपातळीत वाढ होऊन ती पुन्हा दहा फुटांपर्यंत गेली. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणीपातळी झपाट्याने वाढ झाली.