कोरोनाबाधितांचे मृत्यू लपवणार्यांवर कारवाई करा
भाजपाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
सोलापूर (प्रतिनिधी) कोरोनाबाधितांचे 40 मृत रूग्ण लपवणे ही धक्कादायक आणि गंभिर बाब आहे. एवढेच रूग्ण आहेत की आणखी काही रूग्ण लपवले आहेत, हे पहावे लागेल. सोलापूर जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार झाकण्याचा हा प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.

शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी खा. महास्वामी, आ. देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेतली, त्यानंतर पत्रकारांशी आ. देशमुख बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार म्हटल्यावर प्रशासनाकडून लपवलेली मृत्यू संख्या बाहेर आली. हे 40 मृत रूग्ण कोणी आणि कशासाठी लपवले, यात कोणाची चूक आहे, दोषी कोण आहेत, आणखी किती जणांच्या मृत्यूची नोंद केली नाही याची उत्तरे मिळाली पाहिजेत. जिल्हाधिकार्यांनी याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना शिष्टमंडळाने केल्या.

याशिवाय बांधावर खते व बियाणे योजनेचा बोजवारा उडाला आहे. शेतकर्यांना बियाणे देण्याचे नियोजन करावे, शेतकर्यांना पीक कर्ज त्वरित द्यावे, शेतकर्यांच्या दोन लाखांच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी, शेतकर्यांचे कापूस, चना, तुरीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना त्वरित पैसे मिळावेत, ग्रामीण भागातील कामगारांसाठी मनरेगाची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्वरित या मागण्या मान्य न झाल्यास भाजपातर्फे जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.