ओल्ड मॅन इन वॉरः पार्ट 2 ; वाचावे असे काहीतरी

0
78

ओल्ड मॅन इन वॉरः पार्ट 2

विजय चोरमारे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

करोनाविरोधातील लढाई गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू आहे. टाळेबंदी सुरू होऊन ५२ दिवस झाले आहेत. घरात राहूनच आपण ही लढाई जिंकू शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक तज्ज्ञांनी सांगितलं असल्यामुळं त्यांनी तज्ज्ञांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

दरम्यानच्या काळात या लढाईचं स्वरुप बदलत गेलं आणि जाणत्या माणसांनी घरात राहून ही लढाई जिंकता येणार नाही, हे लक्षात आलं तेव्हा ५२ दिवसांनी ते घराबाहेर पडले. तोंडाला मास्क लावून ऐंशी वर्षांचा हा योद्धा शुक्रवारी घराबाहेर पडला, हे दृश्य महाराष्ट्रासाठी मोठं दिलासादायक आहे.

आता कोणत्याही बिकट आव्हानाचा सामना करू शकतो, असा विश्वास शरद पवार यांच्यामुळं महाराष्ट्राच्या मनात निर्माण झाला. मास्क लावून घराबाहेर पडलेले शरद पवार हे गेल्या दोन महिन्यांतलं सर्वात आश्वासक चित्र म्हणावं लागेल.

करोनाविरोधातली लढाई आपण घरात राहूनच लढायची आहे, अशा संदेशामुळं अनेक जाणते लोक घरातून बाहेर पडले नव्हते. नेते बाहेर पडले तर कार्यकर्ते घरात राहात नाहीत, असं आपल्याकडचं चित्र असतं. त्यामुळं अनेक बड्या नेत्यांना घरात राहावं लागलं. शरद पवार यांच्यासारख्या सतत माणसांत असणा-या नेत्यावरही या काळात घरात राहण्याची पाळी आली.

परंतु परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी ती विनातक्रार स्वीकारली. किंबहुना आपल्या कृतीतून घरातच राहण्याचा प्रभावी संदेश त्यांनी दिला. करोनाच्या संकटाचं गांभीर्य ओळखून आपले सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणारे पहिले नेते शरद पवार होते. पवारांसारखा माणूस घरात थांबलाय तिथं आपण कोण, असा प्रश्न अनेकांनी स्वतःच्या मनाला विचारला आणि उंब-याबाहेर पडलेले पाऊल मागे घेतले.

आजच्या काळात पवारांचं अनुकरण करणारा मोठा तरुण वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यामुळं पवारांचं घरी राहणं अनेक अर्थांनी महत्त्वाचं होतं. परंतु घरात असले तरी ते शांत नव्हते. अधुनमधून त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. लोकांच्या भावना समजून घेतल्या. करोनाच्या संकटासंदर्भातील त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. महाराष्ट्राच्या काही प्रश्नांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली.

महाराष्ट्राला केंद्राकडून येणे असलेली रक्कम, साखर कारखानदारीचे प्रश्न, शेतक-यांच्या समस्या आदींकडं त्यांनी केंद्रसरकारचं लक्ष वेधलं. पवार यांच्या सूचनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी एक संवाद साधला. म्हणजे घरात असले तरी पवार स्वस्थ नव्हते. दिवसच्या दिवस निघून जात असताना आणि करोनाच्या संकटाचे गांभीर्य कमी होत नसताना आता घरात राहून चालणार नाही, हे त्यांनी जाणले.

सुरुवातीच्या काळात एकवीस दिवसांत करोना विषाणूची साखळी तोडून आपण संकटमुक्त होऊ शकतो, अशी एक समजूत होती. परंतु पन्नास दिवस झाले तरी तो नियंत्रणात येत नाही. उलट मुंबईसारख्या शहरातली समस्या अधिक गुंतागुंतीची आणि गंभीर बनत चालली आहे. अशा काळात स्वस्थ बसून चालणार नाही किंवा लढणा-या सैन्याला केवळ बाहेरून प्रोत्साहन देऊन चालणार नाही हे पवारांसारख्या जाणत्या नेत्याच्या लक्षात आले असणार. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अत्यंत कठीण प्रसंगामध्ये आपण मैदानात उतरायला पाहिजे,असाच विचार करूनच त्यांनी तोंडाला मास्क लावला असणार.

महाराष्ट्र सरकारकडून काही गंभीर चुका झाल्या आहेत. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने संवेदनशीलतेने हाताळला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याव्यतिरिक्त एकूण करोनाविरोधातील लढाईत अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. रुग्णांच्या आकडेवारीवरून परिस्थिती गंभीर बनल्याचे वाटत असले तरी त्याची अनेक कारणे आहेत.

महाराष्ट्रापुढची परिस्थिती आव्हानात्मक आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्राकडे शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व आहे, ही महाराष्ट्राची मोठी जमेची बाजू आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण कोणत्याही संकटाचा मुकाबला कसा करायचा, याचा अनुभव पवारांएवढा देशातील अन्य कोणत्याही नेत्याकडे नाही.

१९९३ची घटना सगळ्यांना माहीत आहे. राज्यभरातील गणेशविसर्जन मिरवणुका आणि कायदासुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर पहाटे साडेतीन वाजता मुख्यमंत्री शरद पवारांनी अंथरुणावर अंग टेकलं, तेवढ्यात भूकंपाचा धक्का जाणवला. तसेच उठून त्यांनी माहिती घेतली तर लातूरला भूकंप झाल्याचं कळलं. त्यांनी सगळ्या स्वीय सहाय्यकांना उठवलं आणि सकाळी सात वाजता विमान तयार ठेवायला सांगितलं.

सकाळी ७.४० वाजता पवारांचं विमान लातूरमध्ये लँड होऊन त्यांच्या गाड्या किल्लारीच्या दिशेनं रवाना झाल्या होत्या. त्यानंतर पवारांनी केलेल्या कामाचा सगळा देश साक्षीदार आहे. या अनुभवामुळंच जेव्हा भूकंपानं गुजरात उद्ध्वस्त झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्याच्या उभारणीची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवली होती. १९९३च्या मुंबई बाँबस्फोटानंतर शरद पवार यांनी मुंबई ज्या वेगानं सावरली, तो इतिहासही फार जुना झालेला नाही.

लोकसभा निवडणूक आणि नंतरच्या काळात महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना रणरणत्या उन्हात शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणारे शरद पवारच होते. आणि गेल्यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये पश्चिम महाराष्ट्र महापुरात बुडाला तेव्हा गावागावात जाऊन तिथल्या लोकांना आधार देणारे शरद पवारच होते. ना त्यांच्याकडे सत्ता होती, ना त्यांचा मतदारसंघ होता. तरीसुद्धा पवारांनी गावागावात जाऊन लोकांना धीर दिला.

संकटाशी झुंजण्याचं वरदान लाभलेल्या शरद पवार यांनी आपलं हे कौशल्य रचनात्मक कार्यासाठी वापरलं, त्याचप्रमाणं त्यांनी ते आपल्या राजकीय वाटचालीतही वापरलं. अलीकडं झालेली विधानसभा निवडणूक हे त्याचं ताजं उदाहरण आहे. अनेक नेते सोडून गेलेले, सोबत असलेले अनेकजण सोडून जाण्याच्या तयारीत असलेले अशा परिस्थितीत भाजपसाठी निवडणूक ही केवळ औपचारिकता उरली असताना शरद पवार मैदानात उतरले आणि सगळं चित्रच बदलून गेलं.

म्हाता-यानं एकहाती निवडणूक फिरवली. अखेरच्या टप्प्यातल्या पावसानं काम फत्ते केलं. पवारांच्या त्या लढाईचा परिणाम आज महाराष्ट्रात दिसतो आहे. आपल्या आयुष्यातील एक अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक लढाई पवार विधानसभा निवडणुकीच्यावेळी लढले आणि भाजपला सत्तेतून बाहेर घालवले.

करोनाविरोधातली लढाई सर्वात कठिण, गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट बनत चालली आहे. अनेक पातळ्यांवरची आव्हानं आहेत. अनेक संकटांच्या काळात देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र गोंधळल्यासारखा झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला पन्नास दिवसांनीही नीटसा अंदाज आलेला दिसत नाही. अशावेळी ऐशी वर्षांचे शरद पवार मास्क लावून मैदानात उतरले आहेत. सबंध महाराष्ट्राला दिलासा देणारं आणि करोनाविरोधात लढणा-या तमाम योद्ध्यांना बळ देणारं हे चित्र आहे!