एसटी क्लार्कचा मुलगा MPSC परीक्षेत राज्यात पहिला;जिद्दीपुढं नियतीही झुकली

  0
  24

  जिद्दीपुढं नियतीही झुकली, 1 मार्काने PSI पदी हुकलेला वैभव राज्यात पहिला 

  सोलापूर, 15 मार्च : अपयशाने खचून न जाता सातत्य ठेऊन प्रयत्न केल्यावर यश कसं पायाशी लोटांगण घालतं, याचं उदाहरण सोलापुरातून समोर आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथं राहणाऱ्या वैभव नवले या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  करमाळ्यात राहणाऱ्या वैभव नवले याची यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अवघ्या एका मार्काने पोस्ट हुकली होती. मात्र आज (मंगळवारी) जाहीर झालेला महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेचा निकाल वैभवसाठी खुशखबर घेऊन आला. या परीक्षेत वैभवने घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.

  यशानं हुलकावणी दिली, पण वैभव अपयशाच्या छाताडावर पाय रोवून उभा राहिला…

  वैभव नवले हा मुळचा करमाळा शहरातील असून त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे करमाळ्यातच पूर्ण झाले आहे. प्राथमिक शिक्षण करमाळा शाळा नंबर ३ येथे झाले़ पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण झाले़ त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले़.

  २०१६ साली झालेल्या पीएसआय परीक्षेत त्याला अपयश आले होते. केवळ 1 मार्काने त्याचा पीएसआय पदाचा नंबर हुकला होता. मात्र, अपयश ही यशाची पहिली पायरी मानून वैभवने पुन्हा लढाईला सुरुवात केली. जिद्द आणि कष्ट यापुढे कधी-कधी नियतीलाही झुकावे लागते, तसेच वैभवच्या बाबतीत घडले. केवळ एका मार्काने पीएसआयची पोस्ट गमावलेला वैभव 2018 च्या पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम आला. 

  दरम्यान, वैभव नवले याचे वडील एसटी विभागात क्लार्क पदावर कार्यरत होते. नुकतेच ते आपल्या सेवेतून निर्वृत झाले. त्यानंतर आता वैभवने मिळवलेल्या यशाने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. गुलाल उधळून वैभवच्या कुटुंबाने आपला आनंद साजरा केला.